सोलापूर/पानगाव/बार्शी : शहीद जवान सुनील काळे अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम.. या घोषणांनी पानगांवचे वातावरण देशभक्तीमय झाले. काश्मीरमधील पुलवामाच्या बंडजू भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सीआरपीएफ जवान सुनील काळे यांच्यावर पानगांव (ता़ बार्शी) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगळवारी पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत पानगाव (ता. बार्शी) येथील सीआरपीएफ जवान सुनील काळे शहीद झाले. पानगाव येथे ही दु:खद बातमी समजताच गावकºयांनी उत्स्फूर्तपणे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून गावच्या सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण केली. लोकांनी आपल्या सुपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी आलोट गर्दी केली. ओले डोळे आणि जड हृदयाने सकाळी दहाच्या सुमारास आपल्या सुपुत्राला गावकºयांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी अनेकांच्या अश्रूचा बांध फुटला.
तत्पूर्वी मंगळवारी दुपारी सीआरपीएफचे काश्मीर सेक्टरचे महानिरीक्षक राजेशकुमार, जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी १८२ बटालियनमधील शहीद जवान हुतात्मा सुनील काळे यांनी मानवंदना दिली. त्यानंतर काळे यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने श्रीनगर येथून पुणे येथे रात्री आठ वाजता आणण्यात आले. पुण्याहून रस्तामार्गे बुधवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान जवान काळे यांच्या मूळगावी पानगाव येथे दाखल झाले.
दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास शहीद जवान सुनील काळे यांच्या पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली़ अमर रहे...अमर रहे...चा नारा गावकºयांनी दिला़ यावेळी सीआरपीएफचे आयजी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अधिकारी, राजकीय नेते उपस्थित होते.