सोलापूर : आपण महागडा मोबाइल वापरतो. मात्र, बोटावर मोजण्याइतपत फंक्शनच लोकांना माहिती असतात. इतर अनेक असे फंक्शन असतात की त्यामुळे मोबाइल सुरक्षित राहतो. चोरीस गेला तरी लोकेशन सापडते. असे असतानाही बहुतांश मंडळी त्याबाबत अनभिज्ञ असतात. एकूणच मोबाइलमधील नवनवे तंत्रज्ञान समजून घेतले तर पोलिसांना ट्रॅक लावणेही सोपे जाणार आहे.
आजकाल मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गर्दीत, रेल्वेत, एसटी स्टँड परिसरात फोन हमखास चोरीला जातात; पण फोन चोरी होऊ नये म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फोन चोरी झालाच तर सर्व प्रथम दुसऱ्याच्या मोबाइलवरून, लॅपटॉप किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन मॅनेज युवर अकाउंटमधून डाटा प्रायव्हसीमध्ये गेले पाहिजे. तेथे सिक्युरिटीमध्ये जाऊन मोबाइल सर्च केला पाहिजे, मोबाइलचे लोकेशन सापडते.
मोबाइलची चोरी झाल्याचे लक्षात येईपर्यंत चोरटा तेथून पसार झालेला असतो. त्यानंतर काही मिनिटांतच मोबाइल स्विचऑफ होतो. असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाइलवर लक्ष ठेवले पाहिजे, शिवाय ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे. मोबाइलमधील माय ॲक्टिव्हिटी सुरू ठेवा ज्यामुळे सर्व डिव्हाइसची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करता येतो.
तत्काळ पोलीस ठाण्यात जा...
- सर्वांत प्रथम तुम्हाला https://ceir.gov.in/home/index.jsp या वेबसाइटवर जावे लागेल.
- मोबाइल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास संबंधितांना इतर काही गोष्टी करता येत नसतील तर त्यांनी तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात जावे. तेथे मोबाइल नंबर, आयएमईआय नंबर, मोबाइल बिलाची माहिती द्यावी लागेल. जेथे फोन हरवला अथवा चोरीला गेला त्या जागेचे नाव, पत्ता सांगावा, फोन कधी हरवला त्याची तारीख द्यावी लागेल.
- तुमचे नाव आणि पत्ता टाका, यानंतर आधार कार्ड अपलोड करून सबमिट करा. फोनची माहिती मिळाल्यावर तुम्हाला कळविले जाईल.
दहा महिन्यांत चोरीला गेले ६६ मोबाइल
शहरामध्ये जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण ६६ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दाखल झालेल्या तक्रारींपैकी बहुतांश मोबाइल संबंधितांना मिळाले आहेत.
शहरातील मोबाइल चोरी
- जानेवारी ११
- फेब्रुवारी ०८
- मार्च ०६
- एप्रिल ०३
- मे ०९
- जून ०५
- जुलै ०८
- ऑगस्ट ०६
- सप्टेंबर ०५
- ऑक्टोबर ०५
बाजारात जाताना नागरिकांनी सावध असणे गरजेचे आहे. आपल्या मोबाइलवर लक्ष ठेवले पाहिजे. मोबाइल चोरीला गेल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी त्या अनुषंगाने तपास केला जाईल.
-बापू बांगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे)
मोबाइल चोरीला गेल्यानंतर प्रथमत: न घाबरता धीर ठेवला पाहिजे. तत्काळ आपल्या गुगल अकाउंटवरून तपास केल्यास त्याची माहिती मिळू शकते. तरीही मोबाइल न मिळाल्यास पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार द्यावी, शक्यतो मोबाइल सापडतो. त्यामुळे घाबरायचे कारण नाही.
-अविनाश पाटील, सायबरतज्ज्ञ.