दरम्यान, शुक्रवारी दिवसभर ७ ठिकाणच्या नाकाबंदीदरम्यान कोरोना चाचणीत तिघे जण पॉझिटिव्ह सापडले. त्यांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.
सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. प्रशासनाकडून कडक निर्बंध घालून संचारबंदी सुरू आहे. अशाही परिस्थितीत तरुण, अबालवृद्ध रस्त्यावर फिरताना दिसत आहेत तर दुचाकीवर मोकाट फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्या अनुषंगाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे व पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी संयुक्त बैठक घेऊन शहराला जोडणाऱ्या प्रमुख ७ रस्त्यांवर नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारपासून नाकाबंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी २० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
दरम्यान, तहसीलदार अभिजित पाटील स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वंदे मातरम चौकात शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकी-चारचाकी नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली. शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकाला ते स्वतः रोखून अगोदर कोरोना चाचणी करा, मगच शहरात प्रवेश मिळेल, अशी भूमिका घेतल्याने नागरिकांना कोरोना चाचणीशिवाय पर्याय उरला नव्हता असे चित्र दिसून आले.
या वेळी तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमनी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेट दिली. अशा प्रकारे पुढील सलग १० दिवस प्रत्येक नाकाबंदीवर शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी केली तर सांगोला कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
-----
सांगोला शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची वंदे मातरम चौकात नाकाबंदीच्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात आली. या वेळी तहसीलदार अभिजित पाटील, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमनी, महसूल कर्मचारी आदी.