सोलापूर : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्री मंडळातील सहकाऱ्यांसमवेत सोमवारी, २६ जून २०२३ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी सकाळी ते हैदराबाद येथून सोलापूरकडे मार्गस्थ झाले असून थोड्याच वेळात ते जिल्ह्यात दाखल होतील. त्यानंतर उद्या मंगळवार २७ जून २०२३ रोजी सकाळी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
सकाळी ते हैदराबादहून निघाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे त्यांनी भोजन केले. त्यानंतर थोड्याशा विश्रांतीनंतर ते सोलापूरकडे मार्गस्थ झाले. सध्या ते नळदुर्ग येथून निघाले असून सोलापूरच्या दिशेने येत आहेत. सोलापुरातील मार्केट यार्ड चौकात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. सोमवारी, रात्री सोलापुरातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. मुक्कामा दरम्यान रात्री ते येथील काही उद्योजकांशी संवाद साधणार आहेत.
मंगळवारी सकाळी ते पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत तेलंगणातील मंत्रिमंडळ, आमदार अन् पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अशा एकूण तीनशे लोकांचा ताफा असणार आहे. दीडशेहून अधिक गाड्यांचा ताफा त्यांच्यासोबत असणार आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा असून त्यांचे काही सुरक्षा एजन्सी प्रमुख सोलापुरात दाखल झाले आहेत.