सोलापूर : केसीआर पक्ष संपूर्ण देशावर राज्य करू शकत नाही. मी गृहमंत्री असताना माझ्या सहीनेच आंध्रप्रदेशातून तेलंगणा राज्य झाले. राव यांची काय स्थिती होती ते मला माहित आहे. मात्र विरोधकांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे शुक्रवारी सोलापुरात आले होते. त्यांनी दिवसभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केसीआरबद्दल वक्तव्य केले. आषाढी यात्रेत यंदा केसीआरचे संपूर्ण मंत्रीमंडळ पंढपुरात येणार आहे. ते काही दिवस सोलापुरात असणार आहेत. केसीआर पक्ष हळूहळू महाराष्ट्रात विस्तार करू पाहत आहे, त्यामुळे याचा काँग्रेसला फटका बसेल का असे शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, केसीआर सारखे छोटे छोटे पक्ष संपूर्ण देशावर राज्य करू शकत नाहीत, मात्र ते काही पक्षांना डोकेदुखी ठरू शकतात. आम्ही कोणत्याही विरोधकांकडे दुर्लक्ष करीत नाही, केसीआरचे मंत्रीमंडळ सोलापुरात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू असेही शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, रेवनसिद्ध आवजे, रॉकी बंगाळे, तिरुपती परकीपंडला, पृथ्वीराज नरोटे आदि उपस्थित होते.