सत्यवान दाढे
अनगर : क्षेत्र कोणतेही असो, त्यात यश मिळवायचेच असे ठरविले की, त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असं ठरवून तेलंगवाडी (ता़ मोहोळ) येथील युवा शेतकरी सोमनाथ शिंदे पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंबाची लागवड केली अन् थेट बांगलादेशाला निर्यात केली़ त्यांनी शेतीत व्यवस्थापनाला महत्त्व दिले़ त्यामुळे त्यांनी पिकविलेल्या डाळिंबाचा आकार, रंग अन् चव पाहून बांगलादेशवासीयांना भुरळ पडली़ त्यानंतर त्यांनी त्याच देशात डाळिंब निर्यात करायला सुरुवात केली़ केवळ कष्टाच्या जोरावर दोन एकरावरून तब्बल ५५ एकर शेती विकत घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात.
तेलंगवाडी येथे वडिलोपार्जित केवळ दोन एकर शेती आहे़ पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जात होती. पण आपण थोडे शिकलो आहोत़ त्यामुळे त्या शिक्षणाचा वापर शेतीत करावा, या उद्देशाने त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली़ टप्प्याने सिद्धेवाडीच्या माळरानावर ३२ एकर शेती घेतली. त्यात डाळिंबाची बाग लावली़ त्यासाठी पाणी कमी असल्याने ठिबक सिंचन केले़ यासाठी वडील संदिपान शिंदे व काका कल्याण शिंदे यांचे मार्गदर्शन व भाऊ शशिकांत शिंदे यांचे सहकार्य लाभले़ यामुळे आज यशस्वी शेती करतोय, असे ते सांगतात.
शेतीत कोणत्याही पिकासाठी शेणखाताची अत्यंत आवश्यकता आहे़ त्यामुळे शेणखाताबरोबरच रासायनिक खतांचा व औषधांचाही वापर केला़ शिवाय मजुरांचा खर्च परवडत नसल्याने यांत्रिकीकरणावर भर दिला़ बागेच्या संरक्षणासाठी शेताच्या भोवती प्रतिबंधक जाळी मारली़ सनबर्निंगपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी कागदाचा व कापडाचाही वापर केला जातो. या सर्वांमुळेच चार एकर क्षेत्रात ५० टन उत्पादन घेऊन २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले.
असे आहे शेतीचे नियोजन- सध्या ५५ एकर शेतीमध्ये २० एकर क्षेत्रावर डाळिंब, २० एकर क्षेत्रावर ऊस, चार एकरात काकडी, चार एकरात टोमॅटो आणि उर्वरित क्षेत्रात पालेभाज्यांसह अन्य पिके घेतली जातात़ सध्या शेती परवडत नाही, अशी सर्वत्र ओरड असते़ पण शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास लागवडीपेक्षा दुपटीपेक्षा जास्त उत्पन्न शेती मिळवून देते़ तरुण आणि गरजू शेतकºयांना बागेच्या लागवडीपासून सर्व व्यवस्थापनासह अगदी व्यापाºयांना माल देण्यापर्यंतची सर्व मदत करण्यास सतत सज्ज असतो, असे समाधान शिंदे यांनी सांगितले़
शेती व्यवसायात यश मिळवायचे असेल तर प्रथम शेतीवर प्रेम व शेतीची सर्व महत्त्वाची कामे स्वत: केली पाहिजेत़ पिकांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केले तर कमी पाण्यावर ठिबकचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळते, याचा मला विश्वास आहे. - सोमनाथ शिंदे, डाळिंब उत्पादक