सोलापूर : सांग माझ्या भावाला, जुनी पेन्शन लवकर चालू कर...असे म्हणत थेट तुळजापूरच्या भवानी मातेला साकडे घालत कर्मचाऱ्यांच्या वतीने भर दिवसा घालण्यात आला जागरण गोंधळ. दरम्यान कर्मचाऱ्यांनीही नृत्य करून जागरण गोंधळाला प्रतिसाद दिला.
जुनी पेन्शनसह अन्य विविध मागण्यांसाठी सध्या पदोन्नती झालेल्या वर्ग-२ व वर्ग-३, ४ संवर्गातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद समोरील पुनम गेट जवळ आंदोलन सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता आंदोलनकर्ते जमा झाले. शहर व जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान आंदोलनस्थळी जागरण गोंधळाच्या पुजेचे साहित्य मांडण्यात आले. जागरण गोंधळ घालणारी मंडळींनी आपल्या कार्यक्रमाचा सुरूवात केली.
सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला जुनी पेन्शन चालू कर....देव मल्हारी रूसून चालला घोड्यावर बसून...पेन्शन चालू झाली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. गेला बानूला आणायला, माळसा लग्नाची असून...अशा विविध गितांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. आम्ही बसून उन्हात, मन लागेल माझ पेन्शन चालू झाल्यावर...आशा पद्धतीने पेन्शन या मागणीवर भर दिला जात होता. दुपारी २.३० वाजे पर्यंत आंदोलन सुरू होते. आंदोलनात महिला व पुरूष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागरण गोंधळा दरम्यान पाठिंबाच्या घोषणाजागरण गोंधळ सुरू असताना, आधून मधून शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने पाठिंबा दिल्याची घोषणा केली जात होते. घाेषणा होताच समोर बसलेले आंदोलकर्ते टाळ्या वाजवून पाठिंब्याचे स्वागत करत होते. महिला कर्मचारीही सकाळ पासून मोठ्या संख्येने एका ठिकाणी बसून होते.