वडवळ: विजयराज डोंगरे तुम्ही आता घरचाच भेदी झाला आहात, तेव्हा तुमचा फायदा आम्हाला झालाच पाहिजे. अनगर अन् बारा वाड्यांमध्ये आजवर ९८ टक्के बोगस मतदान होतेच कसे? तेथे आपला बूथ प्रमुख नेमला तरी तो त्यांचाच कसा होतो? याचे गौडबंगाल जरा सांगा, पुढचे मी पाहून घेतो व तालुक्यात राजकारण करणाºया विकास सोसायट्यांच्या सचिवांच्या बदल्या तालुक्याबाहेर नक्की करतो, अशी टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
वडवळ (ता. मोहोळ) येथील नागनाथ मंदिरात भाजप व महायुती, मित्रपक्षांचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री नागनाथ मंदिरात झाला. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजप नेते विजयराज डोंगरे, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तानाजी खताळ उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, जयसिद्धेश्वर महाराज यांची व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप पूर्णपणे चुकीची व निराधार असून, त्यातील आवश्यक भाग वगळून चुकीचा अर्थ सांगण्यासाठी काहींनी चुकीच्या अफवा पसरवल्या आहेत, यास बळी पडू नका, असे आवाहन केले.
शिवसेना नेते दीपक गायकवाड यांनी डोंगरे यांना उद्देशून ‘दादा तुम्ही अजून टेन्शनमध्येच दिसत आहात आता भाजपचे नेते म्हणून मुक्त वावरा’ या केलेल्या विधानाचा धागा पकडत विजयराज डोंगरे म्हणाले, सर्व टेन्शन जावे म्हणून तर मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी पूर्णपणे भाजपमध्येच राहणार आहे. गेली ५० वर्षे तालुक्यातील सहकार क्षेत्राची पिळवणूक करणाºया विविध कार्यकारी सोसायट्यांच्या सचिवांची तालुक्याबाहेर बदल्या करा, अशी विनंती डोंगरे यांनी सहकारमंत्री देशमुख यांच्याकडे केली.
भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मोहोळ तालुक्यातील दडपशाही व गुंडगिरीचे राजकारण मोडून काढण्यासाठी ही लढाई असून, मोहोळ तालुक्यातील जनतेने कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असे सांगितले.