बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : परप्रांतातून आलेले तेलुगू भाषक बांधव येथील मातीशी, येथील भाषेशी तसेच कलेशी इतके एकरुप झाले की माय मराठी देखील त्यांना आपलंच लेकरू म्हणून कुरवाळते, माया करते़ भरभरुन पारितोषिके तसेच कौतुकांचा वर्षाव देखील करते़ मराठी रंगभूमीवर तेलुगू भाषिकांनी स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी छाप पाडली.
राज्य आणि देशपातळीवर तेलुगू भाषिकांनी मराठी नाटके सादर करून मराठीजनांच्या कौतुकास पात्र ठरले़ अनेक पारितोषिकांवर आपले नाव देखील अभिमानाने कोरले़ कै़ नागेश कन्ना़, कै़ विश्वंभर कन्ना, कै़ कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली, कै़ लक्ष्मीनारायण आकेन, जयंतराव जक्कल, ज्येष्ठ रंगकर्मी दत्तात्रय श्रीराम यांच्यापासून सुरु झालेला तेलुगू अन् मराठी नाट्य प्रवास आज नागेंद्र माणेकरी, प्रा़ अजय दासरी, प्रथमेश माणेकरी, रवि पालमुरी, नरेंद्र कोंगारी या युवा रंगकर्मी यांच्यापर्यंत अखंड सुरु आहे. नागपूरला झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात तेलुगू बांधवांनी सादर केलेल्या विश्वदाभीरामा या मराठी नाटकाचे विशेष सादरीकरण झाले़ तेलुगू संतकवी वेमना यांच्या जीवनावर सदर नाटक आधारित आहे़ संमेलनात या नाटकाला स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळले, हे विशेष...
प्रा़ दासरी हे १९८१ सालापासून नाट्यसेवा करत आहेत़ त्यांनी आतापर्यंत ३० नाटके, २० एकांकिकांमध्ये महत्त्वाची भूमिका केली़ तसेच त्यांनी ४० एकपात्री स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेतला़ युक्रांध, पडघम, शेजाºयावर प्रेम करा, थँक्यू मिस्टर ग्लाड, विरहणी वासवदत्ता, एक फॅन्टसी सुडाची, विश्वदाभीरामा अशा एक ना अनेक गाजलेल्या मराठी नाटकात दासरींनी अजरामर अशा भूमिका केल्या़ त्यांना मराठी नाट्य परिषद तसेच संमेलनाकडून अनेक पारितोषिक देखील मिळाले़दिग्दर्शन, नेपथ्य, निर्मिती तसेच अभिनय क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे़ सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर महानगर शाखेचे अध्यक्ष आहेत़ या शाखेतील बहुतांश सदस्य हे तेलुगू नाट्य कलावंत आहेत़ महानगर शाखेच्या माध्यमातून उर्दू, मराठी, तेलुगू, कन्नड तसेच हिंदी या आंतरभारतीय भाषा आणि नाट्य संस्कार जपण्याची त्यांची इच्छा आहे़ तसे प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहेत.
युवा रंगकर्मी प्रथमेश माणेकरी यांनी कोल्हापूर विद्यापीठाकडून नाट्य शास्त्रात डिप्लोमा पदवी मिळवली आहे़ त्यांचे वडील नागेंद्र माणेकरी देखील ज्येष्ठ रंगकर्मी आहेत़ ते सध्या रेल्वेत नोकरीला असून, झंकार सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून नागेंद्र आणि प्रथमेश पिता-पुत्र नाट्यदेवतेची सेवा करत आहेत़ प्रथमेश हा हॉटेल व्यवसाय सांभाळत नाट्य आराधना करतोय़ त्याने आतापर्यंत काटेरी गुलाब, नवी पहाट, जंतर मंतर पोरं बिलंदर, राखेतून उडाला मोर, माता द्रोपदी, युगांतर, आधार, रस्ता, कौल, झिंगाट धर्म सैराट जाती, सम्राट अशोक, कंस कथा अस्तित्वाची, रक्ताभिषेक, चाफा सुगंधी, अग्निपथ एक अमृतगाथा इत्यादी नाटकात महत्त्वाची भूमिका साकारली आहे़ प्रथमेशला दोन वेळा महाराष्ट्र राज्य शासनाकडून अभिनय गुणवत्ता पारितोषिक मिळाले आहे़ १५ नोव्हेंबरपासून नाट्य स्पर्धा येथील हुतात्मा स्मृती मंदिरात सुरु होत आहेत़ स्पर्धेची सुरुवात प्रथमेश दिग्दर्शित चाफा सुगंधी या नाटकाने होणार आहे, हे विशेष़ प्रथमेश हा उत्कृष्ट नृत्यकार आहे़ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यास अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
मार्शल आर्टस्, भरतनाट्यम्, कथ्थक, योगा, बॉडीबिल्डींग तसेच पेन्टिंगमध्ये प्रावीण्य मिळवलेले राजमहेंद्र शंकरराव येमूल हे नाट्यप्रेमी आहेत़ त्यांना लहानपणापासून नाट्याविषयी विशेष रुची आहे़ त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला़ अरुण साधू लिखित पडघम या नाटकात त्यांनी पोलीस आॅफिसरची भूमिका केली होती़ या भूमिकेकरिता त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य मंडळाकडून पारितोषिक मिळाले़ त्यांनी कस्सी या उर्दू नाटकात देखील अभिनय केला़ नागपूर येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सादर झालेल्या विश्वदाभीरामा या नाटकात त्यांची महत्त्वाची भूमिका होती़ तसेच थँक्यू मिस्टर ग्लाड या नाटकात देखील त्यांनी काम केले़ प्रा़ अजय दासरी यांच्या माध्यमातून ते नाट्य क्षेत्रात आल्याचे ते आवर्जून सांगतात़ तसेच सध्या नाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत.