सोलापूर : सोलापुरातील सर्व तेलुगू भाषिक हे आंध्र आणि तेलंगणातून आलेले आहेत. बहुतांश तेलुगू भाषिक हे अशिक्षित असल्याने त्यांचा जन्म घरीच झाला़ त्यांच्याकडे हॉस्पिटलची नोंद नाही़ त्यामुळे त्यांच्या पालकांकडून महापालिकेत त्यांच्या जन्माची नोंदच झालेली नाही़ आजही पूर्वभागातील पन्नास ते साठ टक्के विडी, यंत्रमाग तसेच इतर श्रमिकांकडे जन्मदाखला तसेच इतर जन्म पुरावे नाहीत.
१९८० ते ९० नंतर जन्म घेतलेल्या बहुतांशकडे जन्म पुरावे आहेत तर त्यापूर्वी जन्म घेतलेल्यांकडे जन्म पुरावे नाहीत़ सीएए तसेच एनआरसीचा फटका तेलुगू भाषिकांना बसणार नसला तरी या पार्श्वभूमीवर अशा स्थलांतरित तेलुगू भाषिकांच्या जन्मपुराव्यावरदेखील चर्चा सुरु आहे़ जन्म पुरावे नसल्याने गेल्या काही महिन्यांत शेकडो विडी कामगारांना पेन्शन आणि पीएफ रक्कम मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या़ या प्रश्नी कामगार संघटनांकडून पीएफ कार्यालयासमोर आंदोलने झाली.
जसा तेलुगू समाज आंध्र आणि तेलंगणातून आलेला आहे तसाच लोधी समाजदेखील राजस्थानमधून आलेला आहे़ शहरात लोधी समाजाची संख्या मोठी आहे़ हैदराबादकडून बहुतांश मुस्लीम बांधवही सोलापुरात स्थलांतरित झाले आहेत़ समाजातील बहुतांशकडे जन्म पुरावे नाहीत.
समाजात महिला विडी कामगारांची संख्या मोठी आहे़ १९९५ नंतर विडी कामगारांना पेन्शन योजना लागू झाली़ ही योजना लागू झाल्यानंतर जन्म पुराव्याची गरज भासू लागली़ त्यापूर्वी त्यांना जन्म पुराव्याची आवश्यकता नव्हती़ तोंडी सांगितलेल्या तारखेनुसार विडी कारखानदार कामगारांच्या जन्मतारखेची नोंद करायचे़ पण, पेन्शन लागू झाल्यानंतर प्रत्यक्षात जन्म दाखल्याची गरज निर्माण झाली.
पालकांकडे जन्म पुरावे नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना जातीचा दाखला काढताना प्रचंड त्रास झाला़ अनेकांना शिष्यवृत्तीचा लाभही घेता आला नाही़ नवीन पिढीतील अनेकांना शैक्षणिक सुविधांचा लाभही घेता घेईना़ व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यातही अनेकांना मोठी कसरत करावी लागते.
खोटे जन्मदाखले काढणारी टोळी होती सक्रिय- बहुतांश विडी कामगारांकडे जन्मदाखला नाही़ त्यांच्याकडून विडी कारखान्यात चुकीची जन्मतारीख नोंद झाली़ प्रत्यक्षात त्यांचे वय चाळीस ते पंचेचाळीस असायचे तर विडी कारखान्यात पंचावन्न ते साठ वय वर्षे त्यांच्याकडून नोंद झालेली असायची़ असे कामगार जेव्हा पेन्शनसाठी पात्र होतात, तेव्हा त्यांना जन्मपुरावा द्यावा लागतो़ प्रत्यक्षात अशांकडे जन्मदाखलाच नाही़ शाळा सोडलेल्या दाखल्याच्या आधारे पालिकेत जन्मदाखला काढता येतो़ त्यामुळे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सोलापुरात खोटी एलसी काढून देणारी मोठी टोळी सक्रिय होती़ अशा टोळीच्या आधारे अनेकांनी पालिकेत जन्मदाखला काढला आणि पीएफ कार्यालयाकडे जमा केले़ खोटे दाखले जोडून पेन्शनचा लाभ घेत असल्याची बाब पीएफ कार्यालयाच्या निदर्शनास आली़ त्यांनी लगेच विडी कारखानदार आणि कामगारांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली़ या प्रकरणी सोलापुरातील काही कारखानदार तसेच विडी कामगारांवर गुन्हा दाखल आहे़
पूर्वी विडी कामगारांना पेन्शन कायदा लागू नव्हता़ त्यावेळी त्यांच्या जन्मपुराव्याची आवश्यकता भासत नव्हती़ १९९५ साली कायदा लागू झाला़ त्यानंतर जन्म पुरावे देणे बंधनकारक झाले़ १९९० नंतर विडी काम सुरु केलेल्यांकडे जन्म पुरावे आहेत़ १९९० पूर्वी विडी काम करणाºया कामगारांकडे जन्म पुरावे नाहीत़ त्यामुळे मध्यंतरी जन्म पुरावा नसल्याने विडी कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता़ आता आधार कार्डावरील जन्म तारखेचा पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेताना मोठी गैरसोय होत आहे.-बाळासाहेब जगदाळेप्रवक्ते : सोलापूर जिल्हा विडी उत्पादन संघ, सोलापूर