सोलापूर : सोलापूरकरांना कडक उन्हाची सवय आहे हे जरी खरे असले तरी कधी कडक उन्ह, कधी ढगाळ वातावरण तर कधी अधूनमधून येणारा पाऊस यामुळे आरोग्याच्या समस्या चांगल्या भेडसावत आहेत. बुधवारी सोलापूर जरा जास्तच तापलं हाेतं. कमाल तापमानाची नोंद ४२.२ तर किमान तापमानाची नोंद २५.० एवढी झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरकर उकाड्यानं चांगलेच त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापुरातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यात ३७ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४० अंशाच्या पुढे गेले. मागील काही दिवसांत तापमानाचा पारा ४१ अंशाच्या पुढे गेला होता, आता तो ४२ अंशाजवळ आला आहे. कडक उन्हामुळं सोलापुरातील रस्त्यांवरची वर्दळ कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुटीत मैदानावर दिसणारी मुले आता घरातच मोबाइलवर गेम्स्, व्हिडीओ, रिल्स् पाहण्यात दंग असल्याचे दिसू लागली आहेत. हवामान खात्यानं पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस पडणार असण्याची शक्यता आहे. सायंकाळच्या सुमारास आभाळात ढग जमा होत असल्यानं पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे.