सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील घसरलेला तापमानाचा पारा आता हळूहळू पुन्हा वाढत आहे. सोलापूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य वाढ होऊन गुरुवारी ३८.१ अंशाच्या घरात तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून, यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे.
दरम्यान, मागील चार ते पाच दिवसांपासून सकाळची आर्द्रता ४० टक्के तर दुपारची आर्द्रता १५ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे़ दरम्यान, वाºयाचा वेग ११़० कि़मी. प्रति तास वेगाने नैऋत्य दिशेकडून वाहत आहेत़ मंगळवारी शहराचे तापमान यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक म्हणजे ४० अंश सेल्सिअस इतके वाढले होते. त्यानंतर तापमानात घट होऊन बुधवारी ३० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सकाळी नऊपासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिक रस्त्यावरून फिरणे टाळत आहेत. वाढत्या तापमानामुळे दुपारी बारा ते सायंकाळी चारपर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. चटके बसू लागल्यामुळे हैराण झालेले नागरिक उन्हात काम करणे टाळत आहेत.
उन्हामुळे थकवा जाणवत असल्याने नागरिकांना थंडपेयांचा आधार महत्त्वाचा वाटू लागला आहे. डोक्यावर उन्हाळी टोप्या, खांद्यावर पांढरे गमजे घालणे पसंत केले जात आहे, तर महिलावर्ग तोंडावर स्कार्फ घालून फिरतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे़
सकाळी थंडी.. दुपारी कडक ऊऩ़. रात्री उकाडा- मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे़ याचबरोबर हवामानातही दिवसेंदिवस बदल होत आहे़ सकाळी हवेत गारवा निर्माण होऊन थंडी जाणवत आहे़ दुपारच्या सुमारास कडक उन्हाचा त्रास होत आहे तर रात्री उकाड्याने सोलापूरकर हैराण होत आहेत़ या बदलत्या हवामानामुळे लहान मुले व आबालवृद्धांच्या शरीरावर परिणाम होताना दिसत आहे़
मागील पाच वर्षांचे १४ मार्चचे तापमान (अं.से.)सन कमाल किमान
- २०१४ ३८ २०
- २०१५ ३८ २१
- २०१६ ३९ २३
- २०१७ ३८ २३
- २०१८ ३८ २१
मागील पाच दिवसाचे तापमान नोंद (अं.से.)दिनांक कमाल किमान
- ९ मार्च ३८.२ २०.२
- १० मार्च ३९.७ २२़२
- ११ मार्च ३९.३ २२़४
- १२ मार्च ३९.६ २१़६
- १३ मार्च ३९.३ २३
- १४ मार्च ३८.९ २१.६