काशिनाथ वाघमारे
सोलापूर : अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होत आहे. बाबरी मशिदीतील सोलापूरच्या कारसेवकांना या दिवसी एकत्रित आणून विश्व हिंदू परिषद आणि अखिल भारत हिंदू पुरोहित संघ यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच त्या दिवशी शहरातील सर्व मंदिरं विद्युत रोषणाईनं उजळवणार आहेत.
दिवसभरात महाआरती, महाप्रसाद आणि सायंकाळी दीपोत्सवाचे नियोजन करण्याचेही आवाहन संयुक्त बैठकीत करण्यात आले.याबाबत विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित दाजीपेठेतील श्रीराम मंदिरात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत २२ जानेवारी रोजीच्या नियोजनावर चर्चा झाली.
या बैठकीस रामचंद्र जन्नू, मधुकर एक्कलदेवी, मेघनाथ येमुल, सचिन व्हनमाने, सोलापूर शहर श्रीराम मंदिर जन्मोत्सव समितीचे प्रमुख अक्षय अंजिखाने, सुधीर बहिरवाडे, संजय साळुंखे, संजय होमकर उपस्थित होते. दहा दहा सेवकांचे ४० गट..
२२ जानेवारी रोजीचा सोहळा हा ऐतिहासिक ठरावा या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. दहा दहा सेवकांचे ४० गट स्थापन करण्यात आले असून, या गटाच्या माध्यमातून शहरातील सर्व मंदिरांपर्यंत पोहोचून वेगळ्या पद्धतीने तयारी केली जात आहे.२२ जानेवारी दिवस हा ऐतिहासिक ठरवू. त्या दिवशी सोलापूर शहरातील सर्व मंदिरांवर विद्युत रोषणाई होईल. महाआरती, प्रसाद वाटप, भजन आणि मंदिरात सायंकाळी दीपोत्सव करण्याबाबत आवाहन करत आहोत. बाबरी मशिदीवेळी उपस्थित असलेल्या कार सेवकांचा शोध घेतला जात असून, सध्या १२ सेवकांची माहिती हाती आली आहे. दोन दिवसात सर्व कारसेवकांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करणार आहोत.- वेणुगोपाल जिल्लाअध्यक्ष, अ.भा. हिंदू बहुभाषिक पुरोहित संघ