बार्शी : शहर व परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. बार्शीच्या तिन्ही बाजूला रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. सोलापूर रस्त्यावर शहरापासून काही अंतरावर सौंदरे गावाच्या अलीकडील पुलाचे काम सुरू असल्याने प्रवासासाठी तात्पुरता तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड या पावसाच्या पाण्यात वाहून गेला. मध्यरात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे.
बार्शी-लातूर रोडवरील लक्ष्मीनगर पुलावरून पाणी वाहत राहिले. या रस्त्यावरील वाहतूक ही रात्रभर बंद होती. बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील कदमवस्ती येथील रस्ताही खचला आहे. बार्शी तालुक्यात या पावसाची नोंद १६ मिमी एवढी झाली आहे.
बार्शी-सोलापूर रस्त्याचे काम सुरू आहे. पावसामुळे सौंदरे शिवारातील पाणी या पुलातून जाते; मात्र पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरता तयार केलेला रस्ता शनिवारी रात्री मध्यरात्रीत खचला आणि वाहतूक ठप्प झाली. केवळ छोटी आणि दुचाकी वाहने ये-जा करत आहेत.
सलग दोन दिवस झाले शहर व तालुक्यात पाऊस पडत आहे. यात १७ दिवसात ७७.६ मिमी पाऊस पडला आहे.
---
पाणी ओसरल्यानंतर लक्ष्मी नगर पूल खुला...
लातूर रोडवरही मोठ्या प्रमाणावर पुलावरून पाणी वाहत आहे. लक्ष्मी नगरचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रात्रभर वाहतूक बंद होती. सकाळी पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली. सौंदरे येथील रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्याठिकाणी मुरूम टाकून रस्ता भरण्याचे काम सुरू आहे. दिवसभरात मुरूम टाकून हा रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला.
------
शनिवारी पडलेला पाऊस
बार्शी- ८.८, आगळगाव- १४.३, वैराग- २२, उपळे दुमाला-१२.३, गौडगाव-६.५, पांगरी-१४, पानगाव - ४२.५, नारी- ५.८, सुर्डी- ८, खांडवी- १५ अशा सरासरी १६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
----
फोटो - १८ सौंदरे
सौंदरेजवळ तात्पुरता केलेला रस्ता पावसाने वाहून गेला. बार्शी-सोलापूर रस्ता दुपारपर्यंत बंद होता.