मोहोळ : भोयरे हद्दीमध्ये सीना नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करणारी नऊ वाहनांसह दहा ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत जवळपास ६१ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जिल्हा विशेष शाखेच्या पथकाने केला आहे.
मोहोळ तालुक्यात भोयरे हद्दीत सीना नदीच्या पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती सोलापूरच्या विशेष पथकाला मिळाली होती. पोलीस कॉन्स्टेबल बहीर, दत्तात्रय झिरपे, मदने यांच्या विशेष पथकाने भोयरे हद्दीमध्ये मंगळवारी अचानक धाड टाकली. या कारवाईत सात टेम्पो, दोन ट्रॅक्टर, एक मोटारसायकल आणि वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यासह दहा ब्रास वाळूचा साठा जप्त केला. कारवाईत समाधान खंदारे, सागर पवार, तुकाराम खंदारे (सर्वजण रा. नरखेड, ता. मोहोळ), दीपक झेंडगे, भारत साठे या पाच जणांसह एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण हेमाडे यांनी फिर्याद दिली आहे.