सांगोला : सांगोला तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक द चेन करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारपासून (दि. १३) सलग १० दिवस कडक संचारबंदीसाठी सर्वांनीच सहकार्य करावे. प्रशासन सर्वांच्या हिताच्या दृष्टीने काळजी घेत आहे. निर्बंध मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिला.
तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑगस्टपासून १० दिवस कडक संचारबंदी जाहीर केली होती. या संचारबंदीला सांगोला शहरातील व्यापारी महासंघाने कडाडून विरोध करीत १० दिवस व्यवसाय बंद ठेवणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी प्रांताधिकारी भोसले यांनी व्यापारी महासंघ, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली.
या वेळी तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे यांच्यासह व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश वाघ, उपाध्यक्ष बाळासाहेब मस्के, माजी नगरसेवक माउली तेली, आनंद घोंगडे, चंदन होनराव, अजय भोसले, गोपाल चोथे, अमोल बोत्रे, राजेंद्र अरबळी, विकास सराटे, रहिमान बागवान, पोपट जाधव, कुरकुटे आदी उपस्थित होते.
सामूहिक प्रयत्नांची गरज
प्रशासनाला सर्वांच्या हिताच्या दृष्टीने काळजी घेताना आजघडीला दुकाने बंद ठेवणे, व्यापाराचे नुकसान करणे, ही आर्थिक घडी विस्कळीत होणे योग्य नाही. परंतु वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करत केंद्र शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सांगोल्यात ‘ब्रेक द चेन’ करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
---
...तर थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी
लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महसूलची चार पथके, नगरपालिकेची दोन व पोलिसांची वेगळी पथके असणार आहेत. शहरात नगर परिषदेच्या पथकासमवेत महसूलचे एक पथक तर तीन पथके ग्रामीण भागात पेट्रोलिंग करणार आहेत. ज्या ठिकाणी गर्दी दिसून येईल, तेथे नागरिक असो वा व्यापारी त्याची कोरोना चाचणी केली जाईल. पॉझिटिव्ह सापडला तर त्याची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी केली जाणार असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.
----