पंढरपूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच निवडणूक प्रक्रिया कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि पारदर्शी वातावरणामध्ये पार पडावी यासाठी दहा जणांना दोन वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाई बाबतची माहिती देताना पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील २०११ पासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून, यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अपराध, चोरी, वाळू चोरी, गर्दी, मारामारी,दारू,जुगार,मटका यासारख्या ३१० गुन्हेगारांचा समावेश करण्यात आला आहे. या बरोबरच सी.आर.पी.सी. कलम १४४ अन्वये ७२ जणांना दहा दिवसांकरिता पंढरपूर तालुक्यातून हद्दपार केले आहे.
याबरोबरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून दारू, मटका, जुगार यासारख्या अवैध धंद्यावर छापे घालून २१ आरोपींवर १९ गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून ३८ हजार ४८७ रुपये किमतीची देशी, विदेशी, हातभट्टी, शिंदी आदी मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व जिल्ह्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांसह पोलीस पथकाने हद्दपार व तडीपार करण्याची कारवाई धडाक्यात सुरू केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीमीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणुकीसाठी बंदोबस्तदुसºया टप्प्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या तालुक्यातील ९५ मतदान केंद्रांकरिता पोलीस उपअधीक्षक (०१), पोलीस निरीक्षक (०६), सहायक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक (२७), पोलीस कर्मचारी (४००), होमगार्ड (२३०) आणि एसआरपीएफ (०१) कंपनी असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
यंदाच्या लोकसभा निवडणूक कालावधी दरम्यान जे कायद्याचे उल्लंघन करतील अशा मंडळींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील काळात किमान दहा वर्षे प्रत्येक निवडणुकीच्यावेळी त्यांना कारवाईस तोंड द्यावे लागणार आहे. पोलिसांच्या या फतव्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
यांच्यावर कारवाई विक्रम शिवाजी आसबे, निरंजन राजू कुंचे, लक्ष्मण हणमंत म्हेत्रे, वैभव हणमंत आसबे, रवि पांडुरंग राऊत, सोमनाथ राजेंद्र आसबे, स्वप्निल बाळासाहेब आसबे, सागर भाऊसाहेब आसबे, महेश बाळासाहेब पवार (सर्व रा.गोपाळपूर) आणि हरी ज्ञानेश्वर गडदे (रा.तरटगाव ) या दहा जणांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.