सोलापूर : मड्डी वस्ती, भवानी पेठ येथील राहत्या घरासमोर बांधलेल्या म्हशीचे शेपूट लागल्याच्या कारणावरून मालकिणीच्या डोक्यात फरशी घालून जखमी करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झाली.
बंदेनवाज दिनमाऊली शेख, सद्दाम राज शेख, सलीम दिनमाऊली शेख (सर्व रा. प्रियांका चौक, जतकर वस्ती, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मड्डी वस्ती येथील राहत्या घरासमोर गुलामबी बाशा जतकर (वय ४८, रा.मड्डी वस्ती, भवानी पेठ) या आपल्या म्हशींना चारा घालत होत्या. तेव्हा म्हशीने शेपूट हलवले ते जवळून जाणाºया सद्दाम शेख याला लागले. सद्दाम शेख याने गुलामबी जतकर यांना तुला म्हैस नीट बांधता येत नाही का? असा प्रश्न करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. म्हैस बाजूला घेते तू शिवीगाळ का करतोस असे म्हटले असता पुन्हा सद्दाम शेख याने शिवीगाळ केली.
हा प्रकार पाहून गुलामबी जतकर यांचे पती बाशा जतकर हे बाहेर आले. त्यांनी सद्दाम शेख याला शिवीगाळ का करतो असे विचारत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिघांनीही बाशा जतकर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीला मारत असताना पत्नी गुलामबी जतकर या धावत मध्ये आल्या व त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा सद्दाम शेख याने जमिनीवर पडलेला फरशीचा तुकडा उचलला आणि तो गुलामबी जतकर यांच्या डोक्यात घातला. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. गुलामबी जतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, तपास फौजदार बोराडे करीत आहेत.