लाेकमत पाठपुरावा
साेलापूर : स्मार्ट सिटी नियंत्रण कक्षाच्या ‘आयटी सल्लागार’ नेमणुकीच्या निविदेमध्ये काही त्रुटी आहेत. त्यामुळे ही निविदा नव्या अटी-शर्थींसह काढावी, असे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांना कळविल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी ‘लाेकमत’ला सांगितले.
स्मार्ट सिटीच्या आयटी सल्लागार नेमणुकीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकूण चार कंपन्यांनी निविदा भरली हाेती. यातील रॅन्स कंपनीला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे या कंपनीला काम मिळण्याची शक्यता आहे. परंतु, ही निविदा प्रक्रिया एका कंपनीला समाेर ठेवून काढण्यात आली. यात अनुभव, कामाचा दर्जा याला प्राधान्य दिले नाही. स्मार्ट सिटीचे तज्ज्ञ संचालक नरेंद्र काटीकर यांनी पद्धतशीरपणे रॅन्स कंपनीला गुण वाढवून दिल्याचे दिसते, अशी तक्रार पुण्यातील सूर्यकुमार शिवसागरन् यांनी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर आणि स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडे केली हाेती.
याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लाेकमत’मध्ये प्रकाशित झाले. यापार्श्वभूमीवर मंगळवारी आयुक्त व कार्यकारी संचालक यांची चर्चा झाली. आयटी सल्लागाराला स्मार्ट सिटी व शासकीय कामांचा अनुभव आवश्यक आहे. या प्रक्रियेत इतरही काही त्रुटी असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही निविदा नव्या अटी-शर्थींसह काढणे आवश्यक असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी नमूद केले.
तज्ज्ञ संचालकांचा हस्तक्षेप पुन्हा चर्चेत
स्मार्ट सिटी कंपनीने गेल्या तीन वर्षांत ७०० काेटी रुपये खर्च असलेल्या कामांच्या निविदा काढल्या. काही ठरावीक कंपन्यांना कामे मिळावी या दृष्टिकाेनातून यातील काही निविदा काढण्यात आल्याची तक्रार पी. शिवशंकर यांनीच यापूर्वी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. या कंपन्यांकडे कामाचा अनुभव नसल्यानेच शहरात संथगतीने कामे सुरू असल्याचा आराेप नगरसेवक करीत आहेत. कामे दर्जाहीन असल्याचा आराेप सत्ताधारी भाजप आणि विराेधक करीत आहेत. स्मार्ट सिटीचा पदभार ढेंगळे-पाटील यांच्याकडे आल्यानंतर कामांचा वेग वाढला आहे. नव्या निविदा प्रक्रिया केल्या जात आहेत. परंतु, ढेंगळे-पाटील किंवा इतर अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत काही कामांचा मक्ता निश्चित केला जात आहे. यातही तज्ज्ञ संचालकांचा हस्तक्षेप सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.
मनपा आयुक्तांसाेबत निविदा प्रक्रियेबाबत चर्चा झाली आहे. त्यांचे पत्र आल्यानंतर यावर निर्णय घेता येईल. सध्या काेणताही निर्णय घेतलेला नाही.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटी.