टेंभुर्णी शहरातून गेलेला पूर्वीचा महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्याने शहरातून जाणाऱ्या सव्वासहा किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तत्कालीन भाजपचे माढा तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांनी या अंतर्गत रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे यासाठी रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या रस्त्याच्या कामासाठी मंजुरी घेतली होती. २६ मार्च २०१६ रोजी नॅशनल हायवे ॲथारिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत सोलापूर विभागातील ५ हजार ७०० कोटी रुपयांच्या महामार्ग कामांचे भूमिपूजन रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोलापुरात झाले होते. यामध्ये टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्ग रस्त्याचाही समावेश होता.
परंतु पाच वर्षे उलटून गेली तरी निधीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. या कामास गती देण्यासाठी संजय कोकाटे यांनी तीन-चार महिन्यांपूर्वी पुन्हा गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी प्रकल्प संचालक नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या खुर्चीचा सत्कार केला होता. यापुढे मुंबई येथे चीफ जनरल मॅनेजर यांचा सत्कार करायचा व नंतर वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करावयाचा अशा प्रकारचे आंदोलन कोकाटे यांनी जाहीर केले होते.
तत्पूर्वीच मे महिन्यामध्ये टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या रस्त्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर केल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले होते व तसे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही कळवले होते.
----
एक वर्षे पाच महिन्यांची मुदत
टेंभुर्णी शहरातून जाणारा सव्वा सहा किलोमीटर चारपदरी रस्ता तसेच आढेगाव व मोहोळ येथील महामार्गावरील भुयारीमार्ग यासाठी एकत्रित ८२ कोटी ८३ लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. एक वर्ष पाच महिन्यांत काम पूर्ण करावयाचे असून, ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत टेंडर भरण्याची मुदत देण्यात आल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
----