गतवर्षी १५ व १६ ऑक्टोबर रोजी माण खोऱ्यासह सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे पुराच्या प्रवाहात माण नदीवरील बलवडी, चिणके, वाटंबरे, सांगोला व सावे या पाच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना भगदाड पडून बाजूच्या शेतातील भराव वाहून गेला होता. एकाचवेळी ५ बंधाऱ्यांचे पुराच्या पाण्यात नुकसान झाल्यामुळे मोठ्या संख्येने पाणी वाया जात होते.
नदीकाठच्या लाभधारक शेतकऱ्यांनी संबंधित बंधाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान, सांगोला-भीमा पाटबंधारे कार्यालय शाखा अभियंता शैलेश पवार यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये माण नदीवरील नुकसान झालेल्या बंधाऱ्यांची पाहणी करून ४ कोटी ६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून मुख्य अभियंता विशेष प्रकल्प पुणे विभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठवून दिला होता.
पाठपुराव्यामुळे आले यश
आ. शहाजीबापू पाटील यांनी पुणे सिंचन भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली होती. तर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे संबंधित बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसंदर्भात लक्ष वेधले होते. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून आ. शहाजीबापू पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
वाहून गेलेले बंधारे व मिळालेला निधी
माण नदीवरील बलवडी व चिणके बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ९३ लाख ११ हजार, सांगोला व सावे बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५ लाख ६७ हजार, तर वाटंबरे व गुंजेगाव (मंगळवेढा) बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ७१ लाख ४० हजार रुपयांची अंदाजपत्रकीय ई-निविदा प्रसिद्ध झाली आहे. निविदा भरण्याचा अंतिम दिनांक ११ जूनपर्यंत आहे.