फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि. २१) रात्री ११.३० वाजता पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा वाळू (गौण खनिज) वाहतुकीवर कारवाईसाठी खासगी वाहनाने कोर्टी व रावगाव बीटमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीनुसार पोथरे येथील सीना नदीमधून एक ट्रॅक्टर-ट्राॅली वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खासगी वाहनाने पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा पोथरे ते ढेकळेवाडी वस्तीच्या कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टर व ट्राॅलीचा पथकाला संशय आल्याने चालकाला ट्रॅक्टरसह पकडले. तेव्हा रवींद्र झिंझाडे व महेश झिंझाडे हे संशयित वाळू वाहतूक करताना सापडले.
त्यांच्याकडील चार लाखांचा एक ट्रॅक्टर व दोनचाकी ट्रेलरसह १० हजारांची एक ब्रास वाळू (गौण खनिज) करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास रवींद्र झिंझाडे व महेश झिंझाडे यांच्याविरुद्ध अवैधरीत्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे कृत्य करून शासकीय गौण खनिज वाहतूकप्रकरणी पर्यावरण संवर्धन अधिनियम कायदा १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हा नोंदला आहे.