सोलापूर: जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षेच्या वेळी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी केंद्र व तालुकानिहाय विशेष भरारी पथके नियुक्त करण्याच्या सूचना झेडपी शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षण अधिकाºयांना देण्यात आल्या.
झेडपीच्या शिक्षण समितीची सभापती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील पहिली सभा मंगळवारी झाली. या सभेला सरितादेवी राजेभोसले, सोनाली कडते, उषा सुरवसे, स्वाती कांबळे, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड आदी उपस्थित होते. बैठकीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातून दहावीला ६५ हजार तर बारावीच्या परीक्षेला ६० हजार विद्यार्थी बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कॉपी तपासणीसाठी विशेष पथके नियुक्त करावीत, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच झेडपी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळेत वॉटरबेल उपक्रम शाळेच्या वेळात तीन वेळा राबविण्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या.
झेडपीच्या शाळांवर सोलर युनिट बसविण्यासाठी दोन कोटींची गरज असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीकडे नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी मागणीचा ठराव करण्यात आला. तसेच शेळगी येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहणाºया मुलींना गरम पाण्याची सोय करण्यासाठी झेडपीच्या सेस फंडातून सात लाख खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. खासगी प्राथमिक शाळेतील ७० शिक्षकांचे झेडपी शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते.
ही प्रक्रिया राबविताना समुपदेशन न घेतल्याबाबत शिक्षण संचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता उर्वरित २४ अतिरिक्त शिक्षकांना फेब्रुवारी महिन्यात रिक्त पदांवर नियुक्त्या देताना समुपदेशन प्रक्रिया करावी, अशी सूचना करण्यात आली.
माध्यमिक शिक्षकांचे समायोजनमाध्यमिक शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना वारंवार याद्या बदलल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. यावर बोलताना प्रभारी शिक्षणाधिकारी वठारे यांनी २0 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू आहे. त्यानंतर अल्पसंख्याक अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांचे समायोजन फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. शिक्षकांच्या प्राधान्यक्रमानुसार याद्यात बदल केला. अतिरिक्त ठरलेल्या ९ शिक्षकांना निवडणूक कामाकडे पाठविण्याचे विचाराधीन असल्याचे सांगितले.