सोलापूर: ‘त्या’ डॉक्टराचे समाधान होईपर्यंत नियमाप्रमाणे कोरोना चाचणी घ्या अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
‘कोरोना’ चाचणी पॉझीटीव्ह येईपर्यंत माझा स्वॅब तपासणीला घ्या... असा विचित्र आग्रह जिल्हा परिषदेतील एका डॉक्टराने प्रयोग शाळेतील कर्मचाºयाकडे केल्याचे वृत्त ‘लोकमत’ आॅनलाईनवर झळकले होते. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्याकडून ‘त्या’ डॉक्टराबाबत माहिती घेतली.
मे महिन्यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी जिल्हा परिषदेत आले होते. त्यांच्यासोबत आलेल्या एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. त्या अनुषंगाने ११ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात ते डॉक्टर क्वारंटाईन झाले होते, पण त्यांचासह १0 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर एक शिपाई पॉझीटीव्ह आला. त्यानंतर पुन्हा ३१ जणांचे अहवाल घेण्यात आले. त्यात सर्वजणांचा अहवाल निगेटीव्ह आला. तरीही ते डॉक्टर वैद्यकीय कारण दाखवून रजेवर आहेत. त्यांना आणखीन शंका असेल तर आणखी एकदा चाचणी घ्या अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी दिल्या आहेत. काम थांबणार नाही.
याप्रकारानंतर जिल्हा परिषदेतील बºयाच जणांना त्रास झाला. त्यांना आपल्यालाही कोरोनाची लागण झाली असावी अशी भीती वाटली. ज्यांना ज्यांना अशी शंका आली त्यांना त्यांचे समाधान होईपर्यंत घरी राहण्याचा सल्ला दिल्याचे वायचळ यांनी सांगितले. यात त्यांच्या बंगल्यावरील शिपायालासुद्धा अॅडमिट करण्यात आले होते. उपचारानंतर बरा झाल्यानंतरही आवश्यक ती विश्रांती व वैद्यकीय तपासणीनंतरच कामावर बोलवा असे सूचित केले आहे. कोणाला खरेच त्रास होत असेल तर त्यांच्या उपचाराबाबत हयगय व्हायला नको म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. पण कुणी काम चुकविण्यासाठी असा मार्ग अवलंबत असेल तरी कोणामुळे जिल्हा परिषदेचे काम थांबणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.