दरम्यान, मागीलवेळी आम्ही पक्षाचा आदेश मानत माघार घेतली. मात्र आता आमचा विचार व्हावा, यासाठी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही साकडे घातले आहे.
भाजपकडून पुन्हा विद्यमान आ. प्रशांत परिचारक, त्यांच्या कुटुंबातील उमेदवार अथवा दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे या दोघांच्याच नावावर चर्चा होत आहे. मात्र हे दोघे भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत का याबाबत त्या दोघांनीही जाहीर भाष्य केले नाही. उलट दोघेही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. या मतदारसंघात धनगर समाजाचे मोठे प्राबल्य आहे. या मतदारसंघात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांचे जाळेही प्रबळ आहे. जानकर जरी भाजपचे निकटवर्तीय म्हणून मानले जात असले तरी गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपापासून समान अंतरावर आहेत. यावेळी त्यांनी स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांना सक्रिय करत असताना शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षातील समविचारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन सर्वांच्या संमतीने एक उमेदवार देण्यासाठी मोट बांधण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू
निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असताना मतदारसंघात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. त्यामुळे नक्की कोण कोणत्या पक्षाकडून लढेल, कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळेल, अपक्ष, बंडखोर यांची भूमिका काय? याविषयी चर्चा असली तरी महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ही जागा आपल्याकडे यावी यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.