सोलापूर : सोलापुरातील टेक्स्टाइल उद्योजकांसाठी एक गुड न्यूज असून, मागील दोन वर्षांपासून टेक्स्टाइलची निर्यात पूर्वपदावर येत आहे. एकूण दाेन हजार कोटी उलाढालीपैकी आठशे ते साडेआठशे कोटी उलाढाल निर्यातीतून होत आहे. सध्या पाकिस्तानचे टेक्स्टाइल मार्केट डबघाईला आले असून, याचा थेट फायदा सोलापूरला होत आहे. सध्या दहा ते पंधरा टक्के पाकिस्तानची निर्यात सोलापूरकडे वळवण्यात येथील उद्योजक यशस्वी झाले आहेत.
सन २०१६ पूर्वी सोलापूरची टेक्स्टाइल निर्यात साधारण एक हजार कोटीपर्यंत होती. त्यानंतर निर्यात कमी होत गेली. चारशे ते पाचशे कोटींपर्यंत येऊन थांबली. त्यामुळे या उद्योगाला बुरे दिनाचे ग्रहण लागले. कोरोनानंतर ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. युवा उद्योजक निर्यातवाढीवर भर देऊ लागले. अशात पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली. याचा फायदा सोलापूरला करून घेता येईल, या उद्देशातून येथील युवा उद्योजकांनी निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून याला यश मिळू लागले आहे. पूर्वी आठ ते दहा निर्यातदार होते. आता पंचवीस ते वीस थेट निर्यात करणारे उद्योजक असून त्यांच्याकडून पाचशे ते सातशे कोटी टेरी टॉवेल्सची निर्यात केली जात आहे. यासोबत मुंबईतील व्यापाऱ्यांमार्फत निर्यात करणाऱ्या उद्योजकांची संख्या पन्नास ते साठ इतकी आहे. त्यांच्याकडून दोनशे कोटींची निर्यात केली जाते.