सोलापूर - राज्याच्या राजकारणात भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा होतात. कारण, पक्षाकडून त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप विरोधक नेहमीच करतात. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनीही अनेकवेळा जाहीर कार्यक्रमातून अप्रत्यक्षपणे आपली नाराजीही व्यक्त केली आहे. त्यातच, भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं, अशी ऑफरच आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडेंना दिली आहे. त्यावरुन, माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडेंसंदर्भात विधान केले. आता, त्यावरुन भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी खैरेंवर निशाणा साधला. तसेच, पंकजा मुंडे भाजपातच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे हिच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहेत, असे खैरे यांनी म्हटले होते. खैरेंच्या विधानावर राधाकृष्ण विखेपाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी खैरेंना टोला लगावत पंकजा मुंडेंना मोठा राजकीय वारसा असून त्या भाजपात नेतृत्त्व करत राहतील, असे त्यांनी सांगितले.
पंकजाताई या मोठ्या नेत्या आहेत, त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरेंचे विधान पाहता मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीसी वाटते. खैरेंनी अशी बेताल वक्तव्य करणे बंद केले पाहिजे. पंकजाताईंची भूमिका पक्षाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. ताई या पक्षाचे नेतृत्व करत आहेत आणि यापुढेही करत राहणार, असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले आमदार सुनिल शिंदे
आमदार सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचे मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. हे आम्हाला दिसत आहे. पण हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे.