सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीच मला शहर मध्यमधून उमेदवारी देण्याचा शब्द दिलाय. काही झाले तरी मी शहर उत्तर मतदारसंघात जाणारच नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी दिले. दिलीप माने यांचे शिवसेनेत आम्ही स्वागतच करतो. पण सोलापूर दक्षिण मतदारसंघातून माझा मुलगा अमर हाच सेनेचा प्रमुख दावेदार आहे, असा खुलासा माजी आमदार रतिकांत पाटील यांनी केला.
दिलीप माने यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या गुरुवारी झालेल्या दौºयात विशेष घडामोडी घडल्या. महेश कोठे यांना शहर मध्यऐवजी शहर उत्तरमधून लढण्याचे संकेत देण्यात आले. त्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले होते. या पार्श्वभूमीवर कोठे म्हणाले, माझ्या उमेदवारीचा निर्णय उध्दव ठाकरे घेणार आहेत. त्यांनी मला तसा शब्द दिलाय. पक्षातील लोकांनी तुझ्याविरुध्द कुरघोड्या केल्या तर त्यांचा बंदोबस्त मी करेन, असेही ठाकरेंनी मला सांगितले आहे. मी पक्ष वाढविण्याचे काम केले.
माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. शहर मध्य मतदारसंघातून लढण्यासाठी मी बुथ बांधणी सुरू केली आहे. ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पण आमच्यातील काही लोक पक्षातील ज्येष्ठ लोकांचे कान भरण्याचे काम करीत आहेत. म्हणून मी माझा मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी जाण्याचा प्रश्न येत नाही. माझे दिलीप माने यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी शहर मध्यमधून लढणार नसल्याचे सांगितले आहे.
पक्षाचे काम करताना कर्जबाजारी झालो : पाटलांची खंत- रतिकांत पाटील म्हणाले, मी दिलीप माने यांच्या शिवसेना प्रवेशाचे स्वागत केले आहे. ते माझे मित्र आहेत. शिवशरण पाटलांना पक्षात घेतले पाहिजे. कुणाला आमचा विरोध नाही. आमच्या कुटुंबाने शिवसेनेचे काम निष्ठापूर्वक केले. पक्षाकडून एक रुपया घेतला नाही. उलट पक्ष वाढविण्याच्या कामात आम्ही कर्जबाजारी झालो. शेती विकावी लागली. म्हणून थांबलो नाही. उलट मुलगा अमरला जिल्हा परिषद, बाजार समितीला निवडून आणले. तोच विधानसभेचा प्रमुख दावेदार आहे. युती न झाल्यास शिवसेनेकडून त्याला उमेदवारी मिळावी यासाठी उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहे. ठाकरेंची वेळ मिळावी यासाठी तानाजी सावंत यांना भेटलो. मागच्या काळात आम्ही विरोधात असतो तर सुभाष देशमुख निवडून आले नसते. देशमुखांपेक्षा जास्त काम मी केले आहे. पक्षातील काही लोकांनी गद्दारी केली म्हणून २००९ ला माझा पराभव झाला, अशी टीकाही पाटील यांनी केली.
...तर दोन्ही जागा येणार नाहीत - मी ज्यावेळी शहर उत्तरमधून उमेदवारी मागितली त्यावेळी माझा ए-बी फॉर्म पळविण्यात आला. आता मला शहर मध्यऐवजी शहर उत्तरमधून लढायला सांगितले तर मी निवडणूकच लढणार नाही. मी पक्षाचे काम करेन. मी शहर उत्तरमधून निवडणूक लढलो तर शहर उत्तर आणि मध्य या दोन्ही जागा आम्हाला मिळणार नाहीत. पक्षाच्या हातून दोन्ही जागा जातील, असेही कोठे म्हणाले.