प्रभू पुजारी
पंढरपूर : म्हैसाळ योजनेचे पाणी आपल्या पाठपुराव्यामुळे, आपणच कुणाशी किती वेळा पत्रव्यवहार केला म्हणून, पाणी आणण्यासाठी आंदोलन केले, पाणी संघर्ष चळवळ उभारली, अशा पद्धतीने सर्वच गटाचे नेते सांगत आहेत़ शिवाय तालुक्यातील तब्बल पाच गटांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे म्हैसाळचे पाणी तालुक्यात खळखळू लागल्याचे छातीठोक सांगत श्रेय लाटण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शिरनांदगी तलाव भरून घेण्यासाठी मंगळवेढा शाखा वितरिका क्रमांक १ मधून हुन्नूरच्या बिरोबा देवस्थान ओढ्याद्वारे सोडण्यात आले आहे. हे पाणी तालुक्यात दाखल होताच तालुक्यातील विविध गटांचे नेते त्या ठिकाणी जाऊन जलपूजन करू लागले शिवाय आपल्या पाठपुराव्यामुळेच हे पाणी आल्याचे ठासून शेतकºयांना सांगू लागल्याचे दिसून येत आहे.
मंगळवेढा तालुका हद्दीत म्हैसाळ योजनेचे पाणी येताच आ. भारत भालके यांच्या वतीने माजी झेडपी सदस्य व्यंकटराव भालके, दामाजी मंदिर संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा़ शिवाजीराव काळुंगे, पांडुरंग परिवाराचे (परिचारक गट) माजी शिक्षण सभापती शिवानंद पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर यांनी जलपूजन केले तर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी केवळ पाहणी केली़ शिरनांदगी तलावात पाणी आल्यानंतर तेथे शेतकºयांना सोबत घेऊन जलपूजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोण काय म्हणाले...
तालुक्याच्या हिश्श्याचे पाणी भांडून आणले : भारत भालके आघाडी व सध्याच्या सरकारच्या काळात निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पंतप्रधान सिंचन योजनेतून तालुक्याच्या हिश्श्याचा निधी नियमाप्रमाणे भांडून घेतला़ हे पाणी आल्याने शेतकºयांच्या चेहºयावरचा आनंद पाहून समाधान वाटल्याचे आ़ भारत भालके यांनी सांगितले़
तब्बल ३० वर्षे याच पाण्यावर राजकारण : शैला गोडसे गेली ३० वर्षे येथील शेतकरी म्हैसाळच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मात्र पाण्याच्या जीवावर राजकारण करणाºयांनी ते पाणी कधी येणार? कसे येणार? याविषयी कायम शेतकºयांना अंधारात ठेवले. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळस्तरावर केलेला सततचा पाठपुरावा, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाºयांना दिलेले आदेश यामुळे अधिकाºयांनी म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यासाठी सोडण्यास सुरूवात केली आहे़ हा शेतकºयांचा विजय आहे. यामुळे त्यांच्याच हस्ते जलपूजन करण्याचा आपला मानस आहे, असे शिवसेना महिला आघाडीप्रमुख शैला गोडसे यांनी सांगितले़
पाणी संघर्ष चळवळीच्या कार्यकर्त्यांना श्रेय : शिवाजीराव काळुंगे म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यात आणण्यासाठी पद्मभूषण स्व. नागनाथअण्णा नायकवडी, आ़ गणपतराव देशमुख, स्व. निळू फुले, स्व. आर. आर. पाटील, डॉ़ भारत पाटणकर, वैभव नाईकवाडी यांच्यासह १३ दुष्काळी तालुक्यांतील पाणी संघर्ष चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते. आज तालुक्यात जे म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे त्याचे खरे श्रेय हे या पाणी चळवळीतील कार्यकर्त्यांनाच जाते, असे शिवाजीराव काळुंगे यांनी सांगितले़
युती शासनाची योजना युतीकाळातच पूर्णत्वास : शिवानंद पाटीलयुती शासनाच्या काळात ही योजना मंजूर झाली होती. नंतर आघाडीची सत्ता सलग १५ वर्षे होती. परंतु आघाडी सरकारला ही योजना पूर्ण करता आली नाही. २०१४ ला महायुतीचे सरकार आले आणि या योजनेला भरीव निधी दिल्यामुळेच ही योजना मार्गी लागली. युती शासनाच्या काळात सुरू झालेल्या या योजनेचा अखेर याच सरकारच्या काळात या योजनेचे पाणी येण्याचा मार्ग सुकर झाला. आ. प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावला असल्याचे माजी झेडपी शिक्षण सभापती शिवानंद पाटील यांनी सांगितले़