पंढरपूर : भाजप हा पारदर्शी कारभार करणारा पक्ष आहे. मात्र माढा लोकसभेची उमेदवारी देताना त्यांना ‘त्या’ उमेदवारावरील डाग दिसल्याने त्यांची उमेदवारी रद्द केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली.
संजय शिंदे यांनी रविवारी सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. पंढरपूर तालुक्यातील २१ गावांना त्यांनी रविवारी भेटी दिल्या़ तुंगत (ता. पंढरपूर) येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संजय शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील नेतृत्वाच्या चुकीच्या वागण्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक संस्था अडचणीत आल्या. कारखान्यांमध्ये २०१०-११ पासून पैसे अडकले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँक अडचणीत आली आहे. त्यामुळे हजारो कोटींची आर्थिक झळ शेतकºयांना बसली आहे.
भाजप स्वत:ला पारदर्शी कारभार करणारा पक्ष म्हणून समजतो. कदाचित त्यामुळेच मोहिते-पाटील यांच्यावरील डाग भाजपला दिसले असतील. त्यामुळेच मोहिते-पाटलांची उमेदवारी रद्द झाली असावी, अशी बोचरी टीका शिंदे यांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली.जिल्ह्यातील नेत्यांनी ७०० ते ८०० कोटी रुपये थकविले आहेत. ही रक्कम महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील व मुख्यमंत्र्यांनी ८ एप्रिलपर्यंत देऊन टाकावी. मी लोकसभेचा प्रचार करणे थांबवतो, असे थेट आव्हान चंद्रकांत पाटील यांना संजय शिंदे यांनी दिले.
परिचारक मनाने माझ्याबरोबरच- जिल्ह्यातील अनेक नेत्यांना गोळा करून तिसरा पर्याय म्हणून संजय शिंदे यांनी उभा केला होता. तसेच प्रशांत परिचारक व संजय शिंदे यांचा दोस्ताना जिल्ह्याला माहीत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारीमुळे या तिसºया पर्यायातील नेतेमंडळी तुमच्यापासून दूर झाली का, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, जरी आम्ही वेगळे पक्षातून काम करत असलो तरी मनाने एकच आहोत. अनेकांना राज्य सरकारचा दबाव, विविध प्रकारच्या जबाबदाºया देऊन वेगळे दाखवत असले तरी मनाने एकच आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
रणजितसिंहांनी ग्रामपंचायतही लढवली नाही- भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात माझ्याविरुध्द दिलेल्या उमेदवाराने साधी ग्रामपंचायतदेखील लढवली नाही. ते लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांना धोका पत्करावा लागण्याची शक्यता असल्याचे शिंदे यांनी सांगितले़