सोलापूर : धर्मवीर संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) येथील केटरिंग कॉलेजमधील क्वारंटाइन सेंटरमधील शौचालयातून आरोपी फरार झाला. हा प्रकार शनिवारी सकाळी ८.३० ते ८.४५ वाजण्याच्या दरम्यान घडला. विजय कुंडलिक गायकवाड (वय २९, रा. मंगळूर नं. १, ता. माजलगाव, जि. बीड) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
विजय गायकवाड याच्या विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६५/२०२१ भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली होती, त्यानंतर मोहोळच्या सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान. तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी सोलापुरातील केटरिंग कॉलेजच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले होते. क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांना सकाळी नेहमीप्रमाणे उठवण्यात आले. सर्वांना प्रात:विधीसाठी शौचालयात पाठवण्यात आले. इतरांप्रमाणे विजय गायकवाड हादेखील शौचालयात गेला, मात्र तो बाहेर आलाच नाही. बराच वेळ झाला तरी तो बाहेर कसा आला नाही म्हणून तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना शंका आली.
पोलिसांनी बाहेरून आवाज दिला, मात्र आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी बाहेरून दरवाजा तोडला, आत पाहिले तर कोणीच नव्हते, मात्र खिडकी उघडी होती. तो खिडकीतून पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तत्काळ आजूबाजूला व इतरत्र शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अविराज सुरेश राठोड (नेमणूक मोहोळ पोलीस ठाणे) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपास सहायक फौजदार टंकसाळी करीत आहेत.
एका आठवड्यातील दुसरी घटना
० शांती चौक अक्कलकोट पाणी टाकी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातही क्वारंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहे. विविध पोलीस ठाण्यांत अटक करण्यात आलेले कोरोना पॉझिटिव्ह आरोपी क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत. १७ जानेवारी रोजी सायंकाळी मोक्कामधील आरोपी हातातील बेडीतून हात काढून क्वारंटाइन सेंटरमधून पळून गेला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी दुसरा आरोपी पळून गेला.