पंढरपूर - टाळ मृदंगांच्या गजरात ज्ञानोबा-तुकाराम चा जयघोष करीत आषाढी यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांनी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काल्याचा उत्सव साजरा केला. या सोहळ्यानंतर गोपालकाला गोड झाला गोपाळाने गोडकेला असे म्हणत विविध दिंड्यांनी पंढरपूर मधून आळंदीकडे प्रस्थान केले.
आषाढी व कार्तिकीकेला काला करण्याची येथे परंपरा आहे. आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पौर्णिमेला गोपाळपुरात गोपाळकाला होतो. गेली पाच-सहा दिवसांपासून पंढरीत दाखल असलेल्या भाविकांनी बुधवारी पहाटेपासूनच गोपाल काल्यासाठी शहरात सर्वत्र गर्दी झाली केली. दिंडीतील वारकरी सकाळी चंद्रभागेत स्नान करून शहर प्रदक्षिणा करीत गोपाळपूर कडे जात होते. गोपाळपूर येथे श्रीकृष्णचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरात पहाटे गोपाळकृष्णास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आकर्षक पेहराव करून काकडा आरती झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहाटे मानाची दहीहंडी फोडण्यात आली.
गोपाळपूर येथे आलेल्या दिंड्या मंदिरातील मोठ्या पितळी हंड्यात लाह्याटाकून परंपरेचे काल्याचे किर्तन करून वारक-यांना भाविकांना दही लाह्याचा प्रसाद देत होते. मंदिरास प्रदक्षिणा करून आलेल्या हजारो भाविकांनी परतीची वाट धरली.