सोलापूर : मागील काही दिवसांपासून शहर व जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोलापूरकरांना पहाटेच्या सुमारास थंडी तर दुपारनंतर मात्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. वाढते ऊन चेहऱ्यावर पडल्याने रंग काळा तर पडतोच सोबत उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे घराबाहेर पडताना फक्त टोपी किंवा स्कार्फ न घेता सोबत पाण्याची बाटलीही ठेवणे गरजेचे आहे.
सध्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. पहाटे गारवा जाणवत असून, दुपारी ऊन वाढत आहे. या विचित्र वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सरासरी तापमान हे ३५ च्या पुढे सरकले आहे. ऊन वाढल्यामुळे हिटस्ट्रोक, सनस्ट्रोक होऊन अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, त्वचा कोरडी पडणे आदी त्रास होऊ शकतात.
-----------
कमाल तापमान वाढ
- २७ फेब्रुवारी - ३५.२
- २६ फेब्रुवारी - ३६.४
- २५ फेब्रुवारी - ३७.०
- २४ फेब्रुवारी - ३६.४
---------
उन्हाळ्यात काय काळजी घ्याल
- - दुपारी १२ ते ३ यावेळेत उन्हात फिरू नका
- - चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू पिऊ नका
- - ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी पेय प्या
- - शिळे अन्न खाऊ नका
- - सैल आणि सुती कपडे वापरा
- - पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा
- - अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
वारंवार पाणी प्या..
उन्हाळ्यात घाम येऊन शरीराचे तापमान योग्य राखले जाते; मात्र यासाठी शरीराला आवश्यक पाणी मिळणे गरजेचे असते. या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम चयापचय क्रियेवर होतो. त्यामुळे वारंवार पाणी पिणे आवश्यक असते.
ऊन वाढत असल्याने नागरिकांनी शक्यतो दुपारी बाहेर फिरणे टाळावे. बाहेरची कामे सकाळी ७ ते ११ दुपारी ४ ते ७ या वेळेतच पूर्ण करुन घ्यावीत. कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा लिंबू सरबत प्यावे. पांढरे कपडे घालावे जेणेकरुन शरीराला कमी ऊन लागते. चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे असे त्रास वाटत असल्यास लगेच डॉक्टरांकडे तपासणीला यावे.
- डॉ. विठ्ठल धडके, औषध वैद्यकशास्त्र तज्ज्ञ