बार्शी : माझा मोबाईल चोरीला गेला आहे, तु इथे काय करतोस?. मोबाईल शोधून दे म्हणत शिवाजी पोलिस चौकीसमोरील बोर्ड फाडला. पोलिस चौकीतील कागदपत्रे फेकून दिली, अन पोलिसाची गच्ची पकडल्याप्रकरणी एका विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी १० वाजता घडला.
धनाजी बिरमल काळे (वय ४० घाणेगाव ता. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस चौकीत पोलिस नाईक दत्तात्रय आडसुळ हे नेहमी प्रमाणे काम करीत बसते होते. धनाजी काळे हा चौकीसमोर आला व आरडा ओरड करीत शिवीगाळ करू लागला. दत्तात्रय आडसुळ हे आवाज ऐकून बाहेर गेले अन त्याला विचारणा केली. तेव्हां धनाजी काळे याने माझा मोबाईल चोरीला गेला आहे, तो मला शोधून दे असे म्हणाला. आडसुळे यानी त्याला पावती घेऊन ये व शहर पोलिसात तक्रार दे असे म्हणाले. त्यावर त्याने चिडून पोलिस चौकीसमोरील डिजिटल बोर्ड फाडला. आडसुळ आत निघून गेले असता, धनाजी काळे हा चौकीत गेला. आडसुळ यांच्या हातातील गुन्ह्याचे कागदपत्रे ओढून घेतले व फेकून दिले. पोलिसाची गच्ची पकडून खाली ढकलून दिले. धनाजी काळे याला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरूद्ध सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.