सोलापूर : वेळ दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमाराची...पांढरा शर्ट अन् काळी पॅन्ट परिधान केलेला एक व्यक्ती सोलापुरातील जिल्हा परिषदेत दाखल झाला...भराभरा चालत हातात पेट्रोलची बाटली अन् माचिस...मुख्य प्रवेशव्दारावर आल्यावर हातातील बाटलीचे टोपण उघडले अन् अंगावर घेत घेत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या केबिनपर्यंत पोहोचले. नंतर सुरक्षारक्षकांच्या मदतीने ते सीईंओंना भेटले अन् चर्चा केल्यानंतर मार्ग काढला अशी माहिती जिल्हा परिषदेच्या एका अधिकार्यानं लोकमत शी बोलताना सांगितली.
सचिन राजू चव्हाण (वाफळे, ता. मोहोळ) असे अंगावर पेट्रोल ओतून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील वाफळे येथील एका लोकप्रतिनिधींने ग्रामपंचायतीची बेकायदेशीर जागा हडप करून व्यापारी गाळे बांधले. या बेकायदेशीर कामकाजाबाबत आंदोलन करण्यात आले, तेव्हा गाळे सील करण्यात आले होते. मात्र संबंधित लोकप्रतिनिधी यांनी कोणतीही परवानगी न घेता सील तोडून व्यापारी गाळे खुले केले आहेत. त्या संबंधित लोकप्रतिनिधीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र सीईंओं यांनी चव्हाण यांची बाजू ऐकून घेऊन संबंधित तक्रारीची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे चव्हाण यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.