सोलापूर : पंढरपूर-पुणे पालखी मार्गावर नातेपुते येथे एका हाॅटेलजवळ एसटी बसला पाठीमागे टाकून निघालेल्या वेगातील कारने समाेरुन येणा-या कारला जोरात धडक दिली. या अपघातात मोरोचीतील किराणा व्यापारी जागीच ठार झाला. ऐन दिवाळीत झालेल्या या अपघाताने मोरोचीवर शोककळा पसरवली. सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी दूपारी हा अपघात झाला. या अपघातात गोरख शंकर पानसकर (वय ५५, रा. मोरोची, ता.माळशिरस) या किरणा व्यापा-याचा मृत्यू झाला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पंढरपूर- आळंदी पालखी मार्गावर नातेपुते परिसरात एका हाॅटेलजवळून एक कार (एम.एच. १४ / ए. एम. २६४२) ही नातेपुतेहून मोरोचीच्या दिशेने निघाली होती. अपघातातील दुसरी कार (एम.एच. ४३ / ए. टी.५१२४) फलटणहून पंढरपूरकडे निघालेली होती.
दुपारच्या सुमारास फलटण येथून निघालेली कार ही एस. टी. बसला ओव्हरटेक करून पूढे आली आणि वेगावर नियंत्रण न आल्याने समोरुन आलेल्या कारला जोरात धडकली. या अपघातात गोरख पानसकर हे जागीच मरण पावले. ते मोरोची येथील प्रसिध्द किराणा व्यापारी होते. ३० वर्षांपासून ते मोरोचीत किराणा दूकान चालवत होते. ऐन दिवाळीत अपघात होऊन पानसकर यांचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नातेपुते पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास हवालदार माने करत आहेत.