सोलापूर : तुळजापूर रोडवरील हगलूरमध्ये तीन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या एम. ए. कॅपिटल रेस्टाॅरंट ॲन्ड बारवर पोलिसांनी जेव्हा छापा घातला, तेव्हा खुद्द बार मालकाच्या वाढदिवसानिमित्त बारबाला नृत्य करीत होत्या अन् केक कापला जात होता. पोलिसांनी सहा महिला, चार बाऊन्सरसह २८ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
हगलूर येथे डान्स बार सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना कळली. त्यांनी ही घटना वरिष्ठांना कळवून कारवाईसाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. नागनाथ खुणे, स.पो.नि. अनिल सनगल्ले, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे फौजदार शिवकुमार जाधव व त्यांच्या पथकाने या बारवर छापा टाकला. त्यावेळी स्टेजवर सहा महिला अंगावर तोडक्या कपड्यात डी. जे. म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या. तसेच समोरील बाजूस सोफ्यावर काही ग्राहक नर्तकींकडे पाहून अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नाचत होते. यामुळे अधिकाऱ्यांनी बार मॅनेजरकडे ऑर्केस्ट्राॅ बार परवान्याबाबत विचारणा केल्यानंतर परवाना नसल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. नागनाथ खुणे, अनिल सनगल्ले, पो.स.इ. शिवकुमार जाधव, पोलीस अंमलदार संदीप काशीद, श्रीकांत गायकवाड, बापू शिंदे, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, आबासाहेब मुंडे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, चालक समीर शेख, प्रमोद माने, महिला अनिसा पटेल, सुनंदा झळके, हवेल जाधव, शिवाजी मोरे यांनी केली.
बीअरचा साठा जप्त
या बारमधून डी. जे. म्युझिकल साउंड सिस्टीम, दोन कुलर, एक लॅपटाॅप, लाईट सिस्टीम, विदेशी दारूचे क्वार्टर व बीअरचा साठा, तसेच १५ मोटार सायकली असा एकूण १४ लाख ४६ हजार ७२५ किमतीचे साहित्य जप्त करण्यात आला.
यांच्यावर झाली कारवाई
आरोपींमध्ये तरुणांची संख्या जास्त अक्षय गिराम (वय २७), अनिल इडागोटे (२७), पिंन्टू साळुंखे (२८), विलास वल्लाल (४४), दीपक बोडा (४३), बन्टे थोबडे (३१), मोहम्मद खत्री (२४), वैभव फाळके (३२), विक्रम सेनी (२८), अर्जून विटकर (२८), जया सफलिगा (रा. कर्नाटक), संतोष घंटे (३४), कुमार आलुरे (२१), विकास राठोड (३५), राहुल जाधव (३१), अमित सुर्वे (३८), महेश गायकवाड (३२), विजय कळसे (३२), धम्मसागर मस्के (३२), महादेव लक्ष्मण आनंदकर (रा. भवानी पेठ, एम ए. कॅपिटल ॲन्ड बारचे मालक), शुभम महादेव आनंदकर (रा. भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यात चार बाऊन्सरचा समावेश आहे.