सोलापूर : वार रविवार...तसा सुट्टीचा दिवस... सकाळी घरातील कामं आवरून मुलं अन् पालकांनी बलिदान चौक गाठला...सकाळच्या प्रसन्न वातावरणात पावसाची रिमझिम सुरूच होती...सुरूवातीला बलिदान चौकात, हुतात्मा स्तंभाजवळ उपस्थित मान्यवरांनी मार्शल लॉ ची संपूर्ण घटना अगदी सहज अन् सोप्या भाषेत सांगितली. एवढेच नव्हे तर त्यावेळेची परिस्थिती, घटना क्रमाक्रमाने मुलांसमोर उलगडली अन् समजून सांगितली. त्यामुळे मुलं अन् पालक इतिहास प्रेमींच्या मनोगताने चांगलेच भारावले.
लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शौर्यगाथा सोलापूरची...चला जाणून घेऊयात हुतात्मांशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणं या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. प्रारंभी लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल बाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर, इटॅक सोलापूरच्या अध्यक्षा सीमांतनी चाफळकर, बेबांळगी शाळेचे मुख्याध्यापक पाटील, प्राध्यापिका लक्ष्मी रेड्डी उपस्थित होेते. प्रास्ताविकानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. मरिआई मंदिर, मार्शल लॉ च्या घटनेतील गोळीबाराचे निशाण, त्याकाळची शाळा, त्याकाळी त्या घटनेत जाळण्यात आलेली मंगळवार पेठ पोलीस चौकी अशी विविध ठिकाणे दाखवित लोकमतने मुलांसमोर खऱ्या अर्थाने इतिहास उलगडला. याचवेळी कॅम्पस क्लबच्या मुलांसोबतच पालकांनीही या उपक्रमाबद्दल कौतुक केले. शौर्य गाथेच्या फेरीची सांगता सर्व चिमुकल्यांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला पुष्प अर्पण करून झाली. या उपक्रमासाठी सोलापूर इटॅकचे सहकार्य लाभले.
-----------
मान्यवरांच्या मनोगतातून...
- बेबांळगी शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक पाटील यांनी जिथे मल्लपा धनशेट्टी यांनी शिक्षण घेतलं. त्या शाळेविषयी माहिती दिली. त्यावेळेची शाळेची परिस्थिती अन् आताची परिस्थिती याबाबतही मुलांना समजावून सांगितले.
- प्राचार्य शेख यांनी त्यांचे वडील मार्शल लॉ च्या वेळी पोलीस दलात होते, त्यांनी आपल्या वडिलांनी सांगितलेली सर्व घटना सांगितली, तसेच एखाद्या चौकाला आज ते नाव का आहे, त्यावेळी तिथे काय होतं म्हणून ते नाव पडलं याची खूप छान माहिती दिली.
- प्राध्यापिका लक्ष्मी रेड्डी यांनी सुरुवातीला बलिदान चौकात, हुतात्मा स्तंभ येथील मार्शल लॉ ची संपूर्ण घटना अगदी पूर्ण माहिती देत क्रमाक्रमाने मुलांसमोर उलगडली अन् समजावून सांगितली.