सोलापूर : महापालिका आयुक्त पी. शिवशंकर नागरिकांना केवळ साेमवार आणि गुरुवार असे दाेनच दिवस सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भेटणार आहेत. तक्रार निवारणासाठी नागरिकांनी संबंधित खातेप्रमुख, विभागीय अधिकाऱ्यांनी दुपारी ३ ते ५ या वेळेत भेटावे, असे आदेश आयुक्तांनी दिले.
महापालिकेत सध्या प्रशासकराज आहे. लाेक तक्रारी घेऊन महापाैर, पदाधिकारी यांनाही भेटायचे. आता सर्वच तक्रारी आयुक्तांपर्यंत येत आहेत. यापार्श्वभूमीवर आयुक्त पी.शिवशंकर यांनी मंगळवारी नवे आदेश जारी केले. या आदेशानुसार नागरिकांना केवळ दाेनच दिवस भेटता येईल. खातेप्रमुख, विभागीय अधिकाऱ्यांनी राेज दुपारी तीन ते पाच वेळेत नागरिकांना भेटावे. भेटीची वेळ कार्यालयाच्या दर्शनी भागावर ठळकपणे दिसेल अशी लावावी. कार्यालयाच्या बाहेर नोंद वही ठेवावी. नागरिकांचा शक्यताे हेलपाटा होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आदेशही दिले आहेत.
--
केवळ एकच अधिकारी दिसताे फिल्डवर
महापालिकेत सध्या आयुक्तांसह एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त, तीन सहायक आयुक्त आहेत. आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे वगळता इतर अधिकारी ‘फिल्डवर’ दिसत नाहीत. पांडे यांच्याकडे अनेक लाेक जातात. वरिष्ठ अधिकारी लाेकांना फारसे भेटत नाहीत अशा तक्रारी आहेत. आता आयुक्तांच्या नव्या आदेशामुळे इतर अधिकाऱ्यांना रान माेकळे झाल्याची चर्चा आहे.