उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या पाेचमपाड कंपनीने काम बंद करण्याचा इशारा साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी अर्थात स्मार्ट सिटीला दिला आहे. कंपनीच्या कामगारांना माेहाेळ भागात दरराेज मारहाण हाेते. यातील दाेषींवर कारवाई करावी अशी मागणी कंपनीच्या व्यवस्थापकांनी माेहाेळ पाेलिसांकडे केली. कामगारांवरील हल्ल्याचे प्रकार न थांबल्यास ८५० काेटी रुपयांच्या या याेजनेचे काम बंद करू असा इशाराही त्यांनी दिली.
पाेचमपाड कंपनीचे व्यवस्थापक अरुण पाटील आणि वाहन चालक धानेश्वर सिंग यांनी गुरुवारी माेहाेळ पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. कंपनीच्या कामगारांना काही लाेकांकडून सतत मारहाण हाेते. कामगार काम करण्यास तयार नाहीत. अनेक कामगार भीतीने पळून गेले आहेत. पाेलिसांनी आराेपींचा शाेध घ्यावा. त्यांचा बंदाेबस्त करावा. अन्यथा नाईलाजास्तव काम बंद करू, असे अरुण पाटील यांनी सांगितले. पाेलिस अधिकाऱ्यांना यापूर्वीही या प्रकाराबद्दल ताेंडी माहिती दिली हाेती. त्यांनी पेट्राेलिंग करून आराेपींचा बंदाेबस्त केला असता तर ही वेळ आलीच नसती असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.