सोलापूर : उसाचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज होताच; पण एकरी उत्पादनातही वाढ होईल? याचा अंदाज न आल्याने यंदाचा साखर हंगाम लांबत आहे. साखर आयुक्तांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही अधिक गाळप होईल, असे सध्याचे चित्र आहे.
सध्या राज्यात १९७ तर सोलापूर जिल्ह्यात ३३ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ऊस क्षेत्रात वाढ झाल्याचे साखर कारखाने, कृषी खाते व साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगितले जात होते. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला असताना १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाऊस व पाण्यामुळे ऊस तोडणीला अडथळा येत असतानाही साखर कारखाने सुरू ठेवले.
याशिवाय जून महिन्यापासून चांगला पाऊस पडत राहिल्याने उसाला पोषक ठरले. त्याचा परिणाम उसाचे वजन वाढण्यासाठी झाला. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप दीड कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाले, तरीही आणखीन किती गाळप होईल, याचा अंदाज साखर कारखान्यांना येत नाही.
उताऱ्यात ३० टनांनी वाढ
- - सोलापूर जिल्ह्यात नेहमी हेक्टरी ८५ ते ९५ मेट्रिक टन सरासरी उतारा पडतो. यावर्षी हेक्टरी ११० ते १३० टन उतारा पडत आहे.
- * मागील वर्षी २८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील साखर कारखाने हळूहळू बंद होऊ लागले. ३१ मार्चला संपूर्ण कारखाने बंद झाले होते.
- * यावर्षी ३१ मार्चपासून कारखाने बंद होण्यास सुरुवात होईल व १५ एप्रिलला सर्व कारखाने बंद होतील, असा अंदाज आहे.
- * जिल्ह्यातील १८० लाख मेट्रिक टन ऊस गाळप होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात दोन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप होईल, असे सांगण्यात आले.
साखर आयुक्त कारवाई करणार!
सोलापूर जिल्ह्यातील ३३ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ अशा ४५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या साखर कारखान्यांची एफआरपीबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी सुनावणी घेऊन साखर संचालकांकडे अहवाल सादर केला आहे. सोलापूर विभागातील ४५ पैकी १५ कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, तर ३० कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिली आहे. या अहवालावर साखर आयुक्त कारवाई करणार आहेत.
कालच उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा आढावा घेतला. आजही कारखाने किती दिवस चालतील हे सांगता येत नाही, असे कारखान्यांकडून सांगण्यात आले. एकरी उतारा वाढल्याने व किती ऊस शिल्लक राहिला हे कारखान्यांच्या लक्षात येत नाही.
- पांडुरंग साठे, प्रादेशिक उपसंचालक