सोलापूर : जेवायला माघारी येतो म्हणत घराबाहेर पडलेल्या साडे (ता. करमाळा) तील युवकाचा मृतदेह घरापासून काही अंतरावर आढळून आला. त्याच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागावर गंभीर जखमा आढळून आल्या. या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.रोहित राजा काळे (वय १८, रा. साडे, ता. करमाळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार रोहीत हा शेतामध्ये मजुरी करून कुटुंबियांची उपजिविका करीत होता. शनिवारी रात्री जेवणासाठी माघारी येतो असे घरी सांगून तो घराबाहेर पडला. दरम्यान तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने घरातील लोकांनी त्याचा शोध घेतला. त्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर सापडला. त्यानंतर कुटुंबियांनी करमाळा पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.