सोलापूर : तापाने फणफणा-या मोडनिंबमधील एक २४ वर्षीय युवकाचा रविवारी पुण्यात मृत्यू झाला. डेंग्यूने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी त्याच्या नातेवाईकांस सांगितले. या घटनेनंतर मोडनिंबमध्ये सर्वसामान्य लोक आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. संग्राम उर्फ बबलू प्रमोद जाधव (२४, रा. पालखी मार्ग, मोडनिंब, ता. माढा) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
ताप आल्याने संग्राम जाधवला मोडनिंब येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्ताच्या चाचणीत त्यास डेंग्यू (एन एस वन) ची लागण झाल्याचा अहवाल मिळाला. डॉक्टरांच्या सूचनेनंतर त्याला तातडीने पंढरपूर येथे दवाखान्यात नेले असता त्याची प्रकृती खालावत गेली. मेंदूमध्ये ताप गेल्याने संग्राम हा कोमामध्ये गेल्याचे डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकास सांगितले.
तेथून त्यास पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता मृत घोषित केले. तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने मोडनिंबमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोडनिंब येथील डॉक्टरांशी संपर्क साधला असता डेंगूचा ताप मेंदूपर्यंत पोचून ब्रेन डेड झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.