सुस्ते: मुलांच्या अभ्यासासाठी दोन तास मोबाइल व टीव्ही बंद ठेवण्याचा ठराव पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीने केला आहे. दिवसेंदिवस मोबाइलच्या आकर्षणामुळे तरुण वर्ग मोबाइलमध्ये व्यस्त झाली आहे. त्याचबरोबर शालेय अभ्यासाकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच टीव्हीवर सिरीयलमुळे कुटुंबातील व्यक्तींचा संवाद कमी झाला आहे. कुटुंबाचा संवाद वाढवा व मुलांचे अभ्यासाकडे लक्ष लागावे यासाठी ग्रामपंचायतने रोज दोन तास मोबाइल व टीव्ही बंद ठेवण्याचा ठराव केला आहे.
सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत भोंगा वाजवणार आहे. सायंकाळी सहा ते आठ या दोन तासांच्या कालावधीत गावातील सर्व मोबाइल व टीव्ही बंद ठेवण्याचे ग्रामपंचायतीने आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. या आवाहनाची तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी संपूर्ण गावातून फिरून घरोघरी लक्ष देणार आहे.
महिला सक्षमीकरणासाठीही भर-
गावातील ग्रामपंचायतीचा नियमित कर भरणाऱ्या कुटुंबांसाठी पाच ते सहा माणसाच्या कुटुंबाला वर्षाला पाचशे किलो धान्य मोफत दळून दिले जाते. १५ टक्के निधीतून पीठाची चक्की बसवण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला कल्याणमधून मिरची कांडप मिशन बसवण्यात आले आहे. मिरची कांडप मिशन गावातील महिला बचत गटाला प्रत्येक वर्षी एका गटाला चालवण्यासाठी दिले जाणार आहे. ह्या मिरची कांडप मिशनचे विद्युत बिल ग्रामपंचायत भरणार असून मिरची कांडप मिशन महिला बचत गटासाठी मोफत दिले आहे. महिला बचत गटाने स्वतःची तिखट व मसाले तयार करून बाजारपेठेत विक्री करून त्याचा फायदा गावातील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात होईल, या उद्देशाने हा मिरची कांडप मिशन सुरु करण्यात आली असल्याची माहिती सरपंच सीमा घाडगे यांनी दिली.
...तर करणार दंड
ग्रामपंचायतीने ठराव केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाहणी करणार आहेत. दोन तासांच्या कालावधीत ज्यांच्या घरात शालेय मुले असतील त्या घरात मुलांच्या हातात मोबाइल व घरात टीव्ही चालू आढळल्यास एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.
मुलांचे अभ्यासाकडील कमी झालेले लक्ष, टीव्हीवरील सिरीयलमुळे कुटुंबातील कमी झालेला संवाद कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीने राबवावा हा आमच्या ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. - सरपंच, सीमा घाडगे देगाव