सोलापूर : माढा तालुक्यातील वडाचीवाडी अंजनगाव उमाटे हे ८५० लोकसंख्येचे गाव. नागरिकांच्या कामाकरिता गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन एक आदर्श गाव बनले आहे. या छोट्याशा गावात १५८ घरे आहेत. गावातील ९५ टक्के घरातील प्रत्येकजण नोकरीस आहे. आता गावातील सर्व घरांना एकसारखा गुलाबी रंग देण्यात आला आहे. तसेच घरांच्या भिंतीवर पर्यावरण स्वच्छते याबाबत प्रबोधन करणारे, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगणारे संदेश लिहिलेले आहेत. यामुळे विविध पुरस्कार प्राप्त मिळवणारे तसेच उपक्रमशील गाव म्हणून ओळखणाऱ्या वडाचीवाडी गावाची पिंक गाव म्हणून देखील नवीन ओळख होत आहे.
गावातील प्रत्येक घर सुशिक्षित आहे. गावात २०२१-२२ चा सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे. गावामध्ये आमदार बबनराव शिंदे ऑक्सिजन पार्क प्रकल्प असून, तीन एकरांत एक हजार झाडे लावलेली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पहिला मियावाकी प्रकल्प या गावात राबवला असून दोन एकरांमध्ये दहा हजार झाडांची लागवड केलेली आहे. ग्रामपंचायतीचे संकेतस्थळ असून एसएमएसद्वारे ग्रामसभेची माहिती दिली जाते. ग्रामपंचायतीची वेबसाइट असून या वेबसाइटवर ग्रामपंचायतीच्या सर्व कारभाराची माहिती उपलब्ध आहे. गावात प्लास्टिक वापरास बंदी आहे. गावात पिण्याच्या पाण्याच्या नळास मीटर बसविल्याने मोजूनच पाणी दिले जाते. सार्वजनिक व घरगुती वापरासाठी सौरऊर्जा अथवा एलईडी बल्बचा वापर केला जातो. मागील वर्षात गावात कोणावर एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही. गावात मादक द्रव्ये सेवन व विक्रीवर बंदी आहे.
यासाठी सरपंच रमेश भोईटे, रमेश कदम, सुरवंता गडदे, सुनीता कोलगे, आप्पासाहेब कोकरे, दीपाली जाधव, रंजना जगताप, कदम राजेंद्र, सोमासे मार्तंड, बजरंग गडदे, बिपिन कदम, जयसिंग जगताप, आजिनाथ जाधव, संजय कदम, तात्यासाहेब भोईटे, उमेश भोईटे, पांडुरंग कौलगे यांनी परिश्रम घेतले आहेत.
गावास ५० लाख रुपये बक्षिसजिल्हास्तरीय ‘आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तब्बल तेरा हजार झाडे, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, हागणदारीमुक्त गाव, गावातील बोलक्या भिंती असे अनेक उपक्रम या गावाने राबविल्याने गावात हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.