मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : मराठा आरक्षणासाठी मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज बुधवार २५ ऑक्टोंबर पासून सकाळी १० वाजता दामाजी चौकात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांच्या मुळ अंतरवाली सराटी या गावी उपोषण केले होते त्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी सरकारने १ महिन्यांची मुदत मागितली होती, परंतू मराठा समाजाशी चर्चा करून १० दिवस वाढवून सरकारला ४० दिवसाची मुदत दिली होती. तसेच १४ ॲाक्टोंबर रोजी अंतरवाली सराटी येथे भव्य एल्गार सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
२४ ॲाक्टोंबर रोजी सदरची मुदत संपलेली असताना देखील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या साखळी उपोषणस्थळी उपस्थित रहावे असे आवाहन मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.