सोलापूर/वैराग : फिरत्या चाकावर स्वत:लासुद्धा चक्कर येईल एवढं गरगर चाक फिरवून तयार होणारा गरिबांचा फ्रिज आता घेणाऱ्यांपेक्षा बनवणाऱ्यांनाच परवडेनासा झालाय, अशी खंत तडवळे (ता. बार्शी) येथील बापू कुंभार या माठ बनवणाऱ्या व्यावसायिकांनी मांडली. कारण, पूर्वी नदीकडेची माती फुकट मिळत होती. परंतु आता ती विकत आणावी लागत आहे.
माठातील पाण्याला एक प्रकारची वेगळी गोडी असल्याने अनेकजण माठातीलच पाणी पिणे पसंद करतात. या माठाला गरिबाचा फ्रीज म्हणून संबोधले जाते; पण हाच फ्रीज आता घेणाऱ्यांपेक्षा बनवणाऱ्यांना परवडेनासा झाला आहे. कारण पूर्वी नदीकडेची माती फुकट मिळत होती; परंतु आता ती विकत आणावी लागतेय. तसेच पूर्वी गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी घोडे असायचे त्याची लीदही मोफत मिळत असे. आता घोडेच कमी झाल्यामुळे ती लीदपण दुरापास्त झाली आहे. त्याच्या जागी लाकडाचा भुसा मातीत मिसळण्यासाठी आणावा लागत आहे. लाकडे कापण्याच्या मिलमध्ये अगदी थोड्याच असल्याने भुसाही महाग मिळत आहे; परंतु ग्राहक आमच्या मुद्दलापेक्षाही कमी दरात वस्तूची मागतो. त्यामुळे मनाला खूप वाईट वाटते, अशी व्यथा बापू कुंभार यांनी व्यक्त केली.
गुजरात, राजस्थानमधून माठ
सध्या गुजरात आणि राजस्थान येथून आकर्षक बनवलेले माठ बाजारात येत आहेत; परंतु यामध्ये पाणी थंड होत नाही तसेच यातील पाणी महाराष्ट्रीयन माठासारखे निरोगी गुणधर्माप्रमाणे राहत नाही.
रक्तदाबाच्या त्रासापासून सुटका
महाराष्ट्रीयन माठातील पाणी प्याल्याने टॉन्सिल, सर्दी, घसा याचा त्रास होत नाही. गॅसच्या समस्या उद्भवत नाहीत. पोटाला नैसर्गिक थंडावा मिळून उष्णतेपासून सुटका होते. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून रक्तदाबाच्या त्रासापासून काही प्रमाणात दूर राहता येते चेहऱ्यावर फोड, मुरूम न येता चेहरा चमकदार राहतो. आणि विशेष म्हणजे ही माती विषारी गुणधर्म शोषूण घेणारी असल्याने आपल्याला निरोगी पाणी मिळते, असे डाॅ. सचिन पाटील यांनी सांगितले.
सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे. त्यातच भारनियमानामुळे फ्रीजमध्ये पाणी थंड राहत नाही. तसेच माठासारखी त्या पाण्याला चव येत नाही; परंतु माठांच्या किमतीही वाढलेल्या आहेत. महागाई खूप झाली आहे. कुंभारांच्या कष्टाचा विचार करता महिलांनीही योग्य किंमत देऊन माठ खरेदी करण्यास काही हरकत नाही.
-राणी आदमाने, नगरसेविका
लहान मुलाबाळांसह कुठल्याही यंत्राचा वापर न करता दिवसरात्र खूप कष्ट करतो. आमच्या मुलांबाळांना वेळेवर जेवणही मिळत नाही. सर्व कच्चा माल वाढत्या महागाईमुळे स्वस्त मिळत नाही. याचादेखील सहानुभूतीने ग्राहकांनी विचार करून आम्हाला जास्त तर नकोच, पण योग्य दाम द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे.
-सुनंदा कुंभार, माठ विक्रेते, वैराग