आप्पासाहेब पाटील, सोलापूर: मार्चच्या पहिल्या दिवसांपासून सोलापुरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कमाल ३५ अंशावर असलेले तापमान गेल्या दोन दिवसांपासून ३८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. मंगळवारी सोलापुरात सर्वाधिक ३८.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सोमवारीच्या तुलनेत मंगळवारी कमाल तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हाबरोबर सोलापूरकरांना ढगाळ वातावरणाचाही अनुभव येत आहे. सोलापुरातील हवामान कोरडे आहे. पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. १५ मार्चनंतर तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पहाटेच्या सुमारास थंडी अन् गारवा जाणवत आहे.
उत्तरेकडून येणारा थंड हवेचा प्रवाह क्षीण झाल्यामुळे कमाल-किमान तापमानात वाढ झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवकाळीचे ढगही विरले आहेत. मंगळवारी राज्याच्या बहुतेक भागात ३५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली झाल्याचे सांगण्यात आले. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहून पहाटे थोडीशी थंडी जाणवू शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.