सोलापूर : थंडीचे दिवस असल्याने पाणी तापवण्यासाठी हिटरचे बटन चालू केले मात्र ते बंद करण्याचे विसरल्याने हिटर गरम होऊन फायबरची टाकी फुटली. अन् उकळतं पाणी संबंध घरभर पसरल्याने यामध्ये नऊ वर्षाची बालिका आणि पती-पत्नी असे तिघेजण गंभीररित्या भाजले. सोमवारी पहाटेच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे ही धक्कादायक घटना घडली. अजिंक्या समाधान जगताप (वय- ९), समाधान सदाशिव जगताप (वय- ३५), दीपाली समाधान जगताप (वय- ३०, तिघे रा. सोहाळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे भाजलेल्या तिघांची नावे आहेत.
या सर्वांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नातलग ज्योतिबा जगताप यांनी दाखल केले आहे. यातील समाधान जगताप हे त्यांची मुलगी, व पत्नीसमवेत सोहाळे येथील गावात राहतात. गरम पाणी तापवण्यासाठी त्यांनी ५०० लिटर क्षमतेच्या फायबरच्या टाकीला हिटर बसवून घेतले होते. थंडीचे दिवस असल्याने आणि लाईट अधून-मधून जाते म्हणून रात्री पाणी तापवण्यासाठी हिटरचे बटन चालू केले होते. काही तासानंतर बटन बंद करण्याऐवजी विसरुन गेल्याने टाकीतील पाणी उकळले गेले. हिटरही तापून, टाकी फायबरची असल्याने ती फूटून जवळपास ५०० लिटर पाणी तिघेजण झोपलेल्या अंथूरणावर पसरले.
गरम पाण्याच्या चटक्याने तिघांनी जीवाच्या आकांताना आरडाओरडा केला. या आवाजानं आजूबाजूचे लोक जागी झाले. त्यांना गरम पाण्यापासून दूर केले. तातडीने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणून दाखल करण्यात आणल्याचे भाजलेल्या समाधान जगताप यांचे सोलापुरातील बंधू ज्योतिबा जगताप यांनी सांगितले.
बालिका ७० टक्के भाजली..तिघांवरही शासकीय रुग्णालयातील बर्न केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. यातील नऊ वर्षाची अजिंक्या ही ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून, सर्वांवर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे ज्योतिबा जगताप यांनी स्पष्ट केले.