सोलापूर : जिल्ह्यात सध्या हुरडा पार्टी झडत आहेत; पण यावेळेस हुरडा पार्टीचे स्वरूप बदललेले स्पष्टपणे दिसून येत आहे. गरमागरम आगटीतील हुरड्याची चव चाखण्याची सवय असलेल्यांना आता तव्यावरचा हुरडा खाण्याची वेळ आली आहे.
रब्बी ज्वारीचा जिल्हा म्हणून सोलापूरची महाराष्ट्रात ओळख आहे. मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटच्या बहुतांश क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. जानेवारीपासून ज्वारी हुरड्यास येण्यास सुरुवात होते. शिवारात जमिनीत खड्डा खोदून गोवऱ्याच्या निखाऱ्यावर हुरड्यात आलेली कणसे भाजून अशा गरमागरम हुरड्याची चव चाखण्याची मोठी परंपरा आहे. या काळात शेती नसलेली पाहुणेमंडळी हुरड्याचा आस्वाद चाखण्यासाठी शेतावर जात होती. शेतकरी कुटुंबातील या प्रथेला गेल्या वीस वर्षांत मोठा बदल झाला. राजकीय मंडळींनी हुरड्या पाटर्यांचे स्वरूपच बदलून टाकले. हुरड्याची लज्जत वाढविण्यासाठी वांग्याचे भरीत. शेंगाची चटणी, लसणाची चटणी, गूळ, खारा, मीठ, शेंगाचा कुट, भाजलेल्या शेंगा, शेव, खोबऱ्याचा गोड किस आणि शेवटी ताक अशा पदार्थांची रेलचेल वाढली आहे. बऱ्याच ठिकाणी मार्केटिंग करून पैसाही मिळविला जात आहे. सध्या १२० रुपये किलोने कच्चा हुरडा बाजारात विकला जात आहे. ज्यांना पार्टीला जाणे शक्य नाही असे लोक घरी तव्यावर भाजून हुरड्याची चव चाखताना दिसून येत आहेत.
हुरड्यातही झाला बदल
हुरड्याला पार्टीचे स्वरूप आल्यावर चवीतही बदल होत गेला. मूळ मालदंडी ज्वारीऐवजी खास हुरड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जातीची लागवड वाढली. कुचकुची, गूळभेंडी हुरड्याला मागणी वाढली; पण हा हुरडा फार काळ टिकत नाही. त्यानंतर आता राजहंस हुरड्याची लागवड वाढली आहे. सर्व मोसमात हा हुरडा येतो व खाण्यासठी एकदम मऊ व लुसलुशीत आहे. मात्र, आभाळी वातावरण तयार झाल्यावर या जातीची कणसे लगेच परिपक्व होतात.
आगटीतील हुरडा आता दुर्मीळ
जसे हुरड्याचे प्रकार बदलले, तसे हुरडा भाजण्यातही बदल झाला आहे. शेतात मातीतच खड्डा खोदून गोवऱ्या जाळून फुललेल्या निखाऱ्यावर कणसे भाजली जातात; पण अलीकडे खाणाऱ्यांची संख्या वाढू लागल्यावर लाकडे जाळून कोळशाचे निखारे तयार केले जातात; पण यात भाजलेल्या हुरडा तसाच गरमागरम चोळून देणे जिकिरीचे काम आहे. शेतीत काम केलेल्यांच्या हाताला घट्टे पडलेले असतात; पण आता यांत्रिकीकरणामुळे असे शेतकरी कमी झाले आहेत. त्यामुळे साध्या हाताला आगटीत भाजलेल्या कणसाचे चटके बसतात. त्यामुळे अशी कणसे चोळणारी माणसे भेटत नाहीत. आजची तरुणाई हात काळे होतात म्हणून हे काम करायला तयारी नाही.
या आहेत अडचणी...
हुरडा पौष्टिक आहे. त्यामुळे वरचेवर खाणाऱ्यांची मागणी वाढत आहे; तर दुसरीकडे शिवारात असलेल्या पिकातून हुरड्याची कणसे शोधणे, आगटीत भाजणे अशा लोकांची संख्या कमी होत आहे. हाताला चटके सहन करणे व हात काळे करणे हे आजच्या तरुण पिढीला आवडत नाही. त्यामुळे शेतातून कणसे आणून तव्यात हुरडा भाजून खाल्ला जात आहे; पण आगटीतील हुरडा खाण्याची मजा काही औरच आहे, असा जाणकारांचा अनुभव आहे.